दुर्दैवी घटना : नशिराबादच्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

Jalgaon जळगाव नशिराबाद

नशिराबाद प्रतिनिधी ::> जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळच्या पाटचारीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजता घडली. गुराखी व शेतकऱ्यांनी ही घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तिघांचे मृतदेह पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी बाहेर काढले. यातील दोन बालक हे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत.

मोहित दीपक शिंदे (वय ११), आकाश विजय जाधव (वय १३) व ओम सुनील महाजन (वय ११) अशी मृत बालकांची नावे आहेत. हे तिघे जण सोमवारी दुपारी ११.३० वाजता पोहोण्यासाठी नशिराबादपेठ भागात असलेल्या पाटचारीवर गेले होते. दुपारी २.३० वाजता ते पाण्यात बुडाल्याचे गुरे चारणारे तसेच शेतकरी सोपान वाणी यांच्या लक्षात आले. यानंतर वाणी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात संपर्क करुन माहिती दिली.

यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पंकज महाजन, विनोद रंधे, प्रदीप साळी, अनिल पाटील, मोहन कोलते, भूषण कोल्हे हे घटनास्थळी गेले. सुरुवातीला एका बालकाचा मृतदेह हाती लागला. यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा शोध सुरू झाला. पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता आणखी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

दरम्यानच्या वेळात बालकांचे कुटुंबीय देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तिघे मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. नातेवाइकांनी या ठिकाणीही धाव घेऊन आक्रोश केल्याने वातावरण सुन्न झाले. याप्रकरणी नशरिाबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालयात गर्दी, गावात हळहळ
घटनेनंतर नशिराबाद येथील लोकांनी पाटचारी परिसरात प्रचंड गर्दी केली. मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतरही गर्दी झाली होती. दरम्यान, एकाच वेळी तील बालकांचा मृत्यू झाल्यामुळे नशिराबाद गावात हळहळ व्यक्त करण्यात अाली. या दुर्घटनेने येथील समाजन सुन्न झाले आहे.

गुराखी अन‌् शेतकऱ्यांच्या उशिराने अाले लक्षात
नशिराबाद गावाच्या शेजारी असलेल्या पाटचारीत पाणी असल्याने अनेक जण तेथे पाेहायला जातात. मात्र, एवढी लहान मुले तेथे येथील असा अंदाज कुणालाच अालेला नव्हता. कुणी तरी बुडत असल्याचे गुराखी व शेतकऱ्यांच्या लक्षात अाले. पण ताेपर्यंत खूपच उशिर झाला हाेता.

मोहित-आकाश आतेभाऊ
या घटनेत मृत झालेले माेहित शिंदे व आकाश जाधव हे एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. मोहित या बालकाचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर जाधव दांपत्यास मोहितच्या पश्चात एक मुलगा आहे. तर आकाश याच्या पश्चात जाधव दांपत्यास एक मुलगी आहे. तर आेमच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. तो तीन भावंडांसह आजीकडे राहत होता. ओम हा चौघा भावंडामध्ये मोठा होता. या घटनेमुळे तिघांच्या कुटंुबियांनी प्रचंड आक्रोश केला. तिघे एकाच शाळेच शिकणारे मित्र होते. पोहोण्यासाठी गेल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *