राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला नाशिक विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार

Nashik महाराष्ट्र

नाशिक विभागाचे काम नियोजन पद्धतीने करण्यावर भर; शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना देणार गती : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक : सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून मध्यान्हपूर्व राधाकृष्ण गमे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, महसुल प्रबोधिनीच्या संचालिका गीताजंली बाविस्कर , नगर विकास विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, प्रभारी उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, अरुण आनंदकर, नियोजन विभागाचे उपायुक्त प्रदीप पोतदार, नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, विकास विभागाचे उपायुक्त अरविंद मोरे उपस्थित होते.

श्री. गमे म्हणाले, विभागाचा आढावा घेत असतांना प्रधान्याने विभागातील कोरोनाची स्थिती जाणून घेवून ज्या ठिकाणी पायाभुत सुविधा कमी असतील त्या ठिकाणी रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या मुख्य योजनांपैकी शेतकरी पीक कर्ज वाटप व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत, विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी व्यक्त केले.

शासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेणार
विभागातील शासकीय कामांना व शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांना गती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना भेटी देवून त्यांचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करावीत
नवनिर्वाचित विभागीय आयुक्त यांनी उपायुक्त व सर्व विभाग प्रमुखांना तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करण्याबाबत सूचित केले. तसेच प्रत्येक कामाचे नियोजन करतांना तीन टप्प्यात करुन त्यामध्ये दैनंदिन आवश्यक कामे त्याच दिवशी निकाली काढावीत, आठवड्याची कामे आठवड्यात तर महिन्याभराचा कालावधी असलेली कामे महिन्याभरात निकाली काढावीत. तसेच प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाच्या कामाच्या माहितीची टिपणी व मागील झालेल्या बैठकांचे इतिवृत्त सादर करण्याच्या सूचना श्री. गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

नवनिर्वाचित विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याआधी नाशिक महानगरपालिकेचा महानगरपालिका आयुक्त पदाचा यशस्वी कार्यभार सांभाळला असून केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकला देशात अकराव्या स्थानी नेण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. तसेच नाशिकचे अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तसेच नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *