प्रतिनिधी कैलास कोळी मुक्ताईनगर ::> तालुक्यातील चिंचखेडा बुद्रूक येथील सासर व आलमपूर (जि.बुलडाणा) येथील माहेर असलेल्या विवाहितेने छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी दाखल खटल्यात भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाने पती व सासूला सात वर्ष शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावली.
भुसावळ न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. खटल्यात सरकारी वकील विजय खडसे यांनी सहा साक्षीदार तपासले व त्यात आईसह भाऊ आणि मेहुण्याची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश आर.आर.भागवत यांनी आरोपी पती अनिल खोंदले यास भादंवि ३०४ ब अन्वये सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, १० हजार रुपये दंड तसेच सासू यशोदाबाई खोंदले यांना ४९८ – अ मध्ये तीन वर्ष साधी शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला. आरोपींतर्फे अॅड.मोरे (मलकापूर) यांनी युक्तीवाद केला. तत्कालीन तपासाधिकारी हेमंत कडूकार यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला.
काय होते प्रकरण ::> लग्नानंतर योगिताचा पती अनिल तुकाराम खोंदले व सासू यशोदाबाई तुकाराम खोंदले (रा.चिंचखेडा बुद्रूक) यांनी घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरु केला. मुलीचा होणारा छळ पाहता पार्वताबाई यांनी खोंदले कुटुंबियांना ५० हजार रुपये दिले. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये विवाहितेला नांदवण्यासाठी नेण्यात आले, मात्र छळ कायम राहिला. त्यामुळे १६ मार्च २०१७ रोजी सकाळी विवाहितेने आपल्या आईला फोन करून त्रासाची माहिती दिली, तसेच माहेरी नेण्याची विनंती केली होती. तर दुपारी विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केली. यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.