रखडलेल्या रस्त्यावरून भाजपच्या सभापतींचा भाजपलाच ‘घरचा आहेर’

Politicalकट्टा कट्टा निवडणूक मुक्ताईनगर

प्रतिनिधी मुक्ताईनगर >> नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये संबंधित ठेकेदाराने केलेल्या रस्त्यांची सहा महिन्यातच दुरवस्था झाली असून बरेच रस्ते अपूर्णावस्थेतच आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी थेट सत्ताधारी भाजपच्या शिक्षण सभापती कुंदा अनिल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

ठेकेदारावर कारवाई न केल्यास व कामे सुरू न झाल्यास नगरपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला असून नगरपंचायतीला ‘घरचा आहेर’ दिला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १३ हा प्रभाग संपूर्ण नवीन वस्तीचा आहे. यापूर्वी प्रभागात कोणतीही कामे झाली नाहीत. नगरपंचायतीने शहरातील सर्व प्रभागात रस्त्याच्या कामांसाठी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी ठेकेदाराला कार्यादेश दिला होता. काही ठिकाणी संबंधित ठेकेदाराने कामे सुरू केली, काही ठिकाणी अर्धवट रस्त्यांची कामे सोडलेली आहेत.

परंतु ठेकेदाराने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने ते पावसात वाहून गेले. काही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तर काही कामांना संबंधित ठेकेदाराने सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे आपण संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी कार्यवाही करावी. रस्त्याच्या कामाला आठ दिवसांत सुरुवात न झाल्यास नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसेल, असा इशाराही सभापती कुंदा पाटील यांनी दिला.