महामार्गाने जाणाऱ्या पालकमंत्र्यांना अवैध वाळूची वाहने दिसत नाहीत का?
गिरणा नदीच्या परिक्रमेस आजपासून होणार प्रारंभ

प्रतिनिधी जळगाव >> अवैध वाळू उपसा करुन गिरणा नदीला ओरबाडले जातेय. महामार्गावरुन जाणाऱ्या पालकमंत्र्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने दिसत नाहीत. राज्यकर्ते चुकीच्या कामांना खतपाणी घालत असतील तर त्यांचा बुरखा फाडू. अवैध वाळू उपशाच्या नावावर सुरु असलेली गुंडगिरी आता जनता खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी दिला.

नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत शनिवारी होणाऱ्या गिरणा परिक्रमाबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार सुरेश भोळे, डॉ.राधेश्याम चौधरी, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी उपस्थित होते. अवैध वाळू उपसा रोखण्यासह लिलाव झालेल्या गटांमधून मर्यादेपेक्षा जास्त उपसा होणार नसल्याबाबत प्रशासनाने कारवाई केली पाहिजेत, असे सांगिलते. सर्व पक्षाचे कार्यकर्ते वाळू व्यवसायात असल्याबाबतही त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर चुकीच्या कामांना खतपाणी घालणाऱ्या राज्यकर्त्यांचा बुरखा फाडू, असेही खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

तहसीलदारांची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अवैध वाळू उपशाबाबत लोकप्रतिनिधी बोलत नसल्याबाबतच्या प्रश्नावर आमदार भोळेही उत्तरदायी झाले. प्रशासनाच्या आशीर्वादाने गिरणेतून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जनतेच्या प्रश्नांवर तहसीलदार भेटत नाही. वाळूच्या धंद्यावाल्यांना भेटतात. त्याबाबत तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचे प्रकार सुरु आहेत. त्याला प्रशासन जबाबदार आहे. अवैध वाळू व्यवसायात गुंतलेल्या राजकीय व्यक्तींना उघड करु, असे आमदार भोळे यांनी सांगितले. जळगाव तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत विधिमंडळात तारांकीत प्रश्न टाकलेला होता. तो उपस्थित झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *