चाळीसगाव >> राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसह राज्यभरातील अनेक महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न मांडले. १ ते ४ मार्च दरम्यान झालेल्या कामकाजात त्यांनी १० प्रश्न मांडले. ते विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येऊन त्यावर संबंधित विभागाचे मंत्री व आमदार यांच्यात चर्चा घडून आली.
आमदार चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यात आदिवासी प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत योजना राबवताना क्रांती ज्योती प्रमिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण यात झालेला १ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचा अपहार उघडकीस आणला होता. त्याबाबत त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला. त्यावर आदिवासी विकास मंत्री यांनी, त्याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले.