बोदवडातील बँकेतून साडेआठ लाख लांबवणारा अखेर मध्य प्रदेशात अटक

क्राईम बोदवड

बोदवड प्रतिनिधी ::> येथील स्टेट बँकेतून संशयिताने ८ लाख ४० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना १७ सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी संशयित राजेश मनोहर सिसोदिया याला बोदवड पोलिसांच्या पथकाने, कडिया सांसी (ता.पचोर, जि.राजगड, मध्यप्रदेश) येथे रविवारी अटक केली. संशयिताला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एकूण चार जणांचा समावेश असल्याची कबुली संशयिताने दिली.

शहरातील अमर डेअरी या फर्मची ८ लाख ४० हजार रुपयांची रोकड घेऊन कर्मचारी उमेश महाजन बँकेत भरणा करण्यासाठी गेले. त्यांनी रोकड कापडी पिशवीत घेतली होती. संशयित राजेश सिसोदिया, कुंदन सिसोदिया, शुभम सिसोदिया, सावंत सिसोदिया (सर्व रा. कडिया सांसी) यांनी बँकेतून रोकड लंपास केली होती. फिर्यादी उमेश महाजन कॅशियरसोबत बोलत होते. त्यांनी रोकडची पिशवी बाजूला खुर्चीवर ठेवली होती. त्यांच्यामागे संशयित शुभम सिसोदिया याने ती पिशवी अलगद उचलून नेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते.

७ नोव्हेंबरला बोडा (मध्य प्रदेश) येथील पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी बोदवड पोलिसांशी संपर्क साधला. या गुन्ह्यातील संशयित गावात आल्याची गोपनीय माहिती मध्यप्रदेश पोलिसांनी दिली होती. त्यामुळे पोलिस कर्मचारी कालिचरण बिऱ्हाडे, संदीप वानखेडे यांनी बोडा गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ८ नोव्हेंबरला सकाळी कडिया सांसी येथून संशयित राजेश सिसोदियाला ताब्यात घेतले. त्यान अन्य तीन संशयितांची नावे सांगितले.