विटंबनेची अफवा निघाल्याने खवशी ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास

अमळनेर क्राईम निषेध पाेलिस सिटी न्यूज

लहान मुलांच्या खेळण्यातून अनवधानाने झाला प्रकार
अमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील खवशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि प्रशासन सज्ज झाले. मात्र, लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर ती अफवा ठरली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तालुक्यातील खवशी येथे अज्ञात व्यक्तीने एका महापुरुषांच्या पुतळ्यावर शेणाचा मारा करुन पुतळ्याची विटंबना केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले होते. त्यानंतर गावकरी दक्ष झाले, तर ग्रामस्थांनी या संदर्भात तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, शरद पाटील, पातोंडा आऊट पोस्टचे सुनील पाटील हे घटनास्थळी हजर झाले.

घटना स्थळाजवळच गुरे बांधल्याने तेथे चिखल झाला होता. तर लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले, त्यामुळे ग्रामस्थ, पोलिस अधिकारी, प्रशासन अशा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या वेळी गावातील राहुल पवार, रोहिदास कापडे, कैलास पाटील, बी. के. सूर्यवंशी, भाया पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुतळ्याची केली स्वच्छता
या वेळी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पुतळ्याची विधिवत पूजा करून पुतळा धुतला तसेच आजूबाजूच्या परिसराची सफाई केली. त्यानंतर पुतळ्याच्या आजूबाजूला गुरे बांधण्यास बंदी घालण्यात आली.