अचानक थंडी झाली गायब, वाढला उकाडा

Jalgaon जळगाव धुळे माझं खान्देश

प्रतिनिधी धुळे :>> शहरातील किमान तापमानाचा पारा ८ अंशांवर स्थिरावला होता. त्यामुळे सायंकाळनंतर वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होत होता. मात्र अचानकपणे एका दिवसातच तापमानात बदल होऊन किमान तापमानाचा पारा १३ अंश झाला होता. तर बुधवारी वेधशाळेत नोंद झालेले तापमान १५ अंश सेल्सिअस होते. शहरातील वातावरणात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बदलण्यास सुरुवात झाली होती. किमान तापमानात बदल होऊन ते घसरण्यास सुरुवात झाली होती. तर नोव्हेंबर महिन्यातही वातावरणात बदल सुरू होता.


दिवसा व सायंकाळनंतर गार वारे वाहू लागले होते. दिवसा उन्ह असले तरी सायंकाळनंतर वातावरण गार होत होते. हिवाळ्याची सुरुवात होऊन गुलाबी थंडी जाणवत आहे. दिवसाचे तापमानात फारसा फरक जाणवत नव्हता. मात्र रात्रीच्या किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली.


घसरण होऊन दररोज सरासरी १ अंश सेल्सिअसने तापमान कमी होत असल्याची नोंद वेधशाळेत झाली. तर अखेर १३ नोव्हेंबर रोजी या हिवाळ्यातील किमान तापमान ८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. वातावरणात गारठा वाढला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी किमान १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.


एका दिवसात ५ अंशाने वाढ
एका दिवसातच ५ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. त्यानंतर मात्र किमान तापमान १५ अंश डिग्री सेल्सिअस तापमान कायम आहे. दिवसाही उन्हाचे चटके बसत असून बाहेर फिरल्यावर घाम येत आहे. रात्रीही उकाडा जाणवत आहे. पंखे पुन्हा सुरू करावे लागत आहे.