पीक विमा कंपनीचा निष्काळजीपणा, सहा गावांतील १५ शेतकऱ्यांना फटका

रावेर

रावेर >> हवामानावर आधारित केळी पीक विमा घेतला असतानाही झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील ६ गावातील १५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी याची दाखल घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा घेण्यासाठी गत वर्षी खानापूर, अटवाडा, अजनाड, निरूळ, चोरवड व नेहेते या सहा गावातील काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. या गावातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी एकूण पंधरा शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनी सुमारे ६० एकरांसाठी विमा घेतला होता. त्यासाठी त्यांनी विम्याच्या हप्त्याची २ लाख ४५ हजार ६०७ रुपये एवढी रक्कम खानापूर येथील सेंट्रल बँकेच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून विमा कंपनीकडे भरली होती. दरम्यान नैसर्गिक आपत्तीत केळीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा रीतसर करूनही झालेल्या नुकसानीपोटी या शेतकऱ्यांना अद्याप विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.

पीक विमा योजना राबवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे.