जामनेर तालुक्यात जेठ-भावजयीने केली आत्महत्या…कारण गुलदस्त्यात?

क्राईम जामनेर

पहूर प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील जेठ आणि भावजयी यांनी वाकोद शिवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, लोंढरी बुद्रूक येथील रहिवासी आबा दगडू जोगी ( वय -३५ वर्षे ) आणि (त्याच्या लहान भावाची पत्नी ) त्याची भावजयी अरूणाबाई समाधान जोगी ( वय -२६ वर्षे ) हे दोघे जण अरुणाबाई जोगी यांच्या लहान मुलीसह काल सकाळी साडेदहा वाजेपासून मोटरसायकलवरून ( क्र. एम .एच.१९ ए .जी. ५५९३ ) फरार झाले होते. त्यांचा नातेवाईकांनी तपास केला मात्र काहीही पत्ता लागला नाही.


दरम्यान, आज सकाळी वाकोद शिवारात योगेश गणपत वानखेडे यांच्या शेताच्या बांधावर पत्री शेडजवळ अज्ञात स्त्री-पुरुषाचे मृतदेह आढळून आल्याची खबर वाकोद येथील पोलीस संतोष रामदास देठे यांनी पहूर पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह लोढरी येथील फरारी जेठ – भावजयीचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस पाटील संतोष देठे यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, ज्ञानेश्वर बाविस्कर हे करीत आहेत .

मयत जेठ आबा जोगी यांस २ मुले, पत्नी तर भावजयी अरूणाबाई जोगी हिस पती,दोन मुली, आहेत. या घटनेने लोंढरी परिसरात खळबळ उडाली आहे. आई आणि मोठ्या वडिलांनी विषारी औषध पिऊन ‘जीवनयात्रा संपवली तेव्हा त्यांच्या जवळ असलेली लहानगी धनश्री खेळत होती. तीच्या निरागस भावनेला काय झाले ? काहीच कळले नाही. मनसून्न करणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *