जामनेरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह रात्रभर होता बेडवर पडून

जामनेर निषेध सिटी न्यूज

जामनेर :: > जामनेर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह रात्रभर वॉर्डातच बेडवर पडून होता. मृतदेहाला दुर्गंध सुटल्याने इतर रुग्णांना रात्र जागून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णांनी संताप व्यक्त केल्यानंतर मृतदेह शवगृहात हलवण्यात आला. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

जामनेर तालुक्यातील सामरोद येथील बाधित व्यक्तीवर जामनेरातील खासगी रुग्णालयात १० दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहीती सामरोद गावात मिळाली. काही नातेवाईकांनी रुग्णालयात संपर्क केला असता, रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, असा निरोप त्यांना मिळाला. नंतर त्याच दिवशी मध्यरात्री रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दाखल केल्यानंतर रुग्णाला मॉनिटर लावले गेले. परंतु, मॉनिटरवर कोणत्याही प्रकारचे रिडींग दिसत नव्हते. नंतर आरोग्य कर्मचारी त्याला ऑक्सिजन मास्क लावून निघून गेले. पण रुग्ण कोणतीही हालचाल करत नव्हता. काही वेळाने शेजारच्या बेडवरील दुसऱ्या रुग्णांना शंका आल्याने त्यांनी नर्स, वॉर्डबॉयला माहिती दिली. परंतु, त्यांनी आमच्याकडे पीपीई किट नाही. आता मृतदेह सकाळी हलवला जाईल’, असे उत्तर देऊन त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर काही वेळाने वॉर्डात मृतदेहाला दुर्गंध सुटला. त्याचा त्रास असह्य झाल्याने वॉर्डातील इतर रुग्ण वॉर्डाबाहेर थांबले. त्यांनी रात्र जागून काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर शहराध्यक्ष जितेश पाटील उपजिल्हा रुग्णालयात मित्राला भेटण्यासाठी आलेले होते. त्यांना रुग्णालयातील रुग्ण बाहेर उभे असल्याचे दिसून आले. त्यांनी विचारणा केली असता, रुग्णांनी रात्रीचा प्रकार कथन केला. जितेश पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली. हा प्रकार धक्कादायक असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *