जामनेरचे माजी नगराध्यक्ष ललवाणी यांच्या कारनाम्यांची आमच्याकडे सीडी!

Politicalकट्टा कट्टा जामनेर

जामनेर येथे भाजपचे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर, थेट पुरावे देण्याचे आव्हान

जामनेर प्रतिनिधी >> माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी (दि.२०) पत्रकार परिषदेत सीडी व पेनड्राइव्ह दाखवला. त्यात काय रहस्य दडले आहे? ते योग्य वेळी दाखवून देऊ असे वक्तव्य करत आमदार गिरीश महाजन यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत ललवाणी यांच्या आरोपांचे खंडन केले. तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी ‘जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या कारनाम्यांची आमच्याकडेही सीडी आहे’ असे सांगत सीडी व काही कागदपत्रे पत्रकारांना दाखवली. आमदार महाजन यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, असे आव्हान दिले.

माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आमदार महाजन यांनी बीएचआरच्या जमिनी कमी भावात लाटल्या. पालिका, शेतकी संघात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. ललवाणी यांचे सर्व आरोप भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत फेटाळून लावले.

गिरीश महाजन आमदार होण्यापूर्वीच ललवाणी यांचेवर गुन्हे दाखल आहेत. शेतकी संघात खतांचा गैरव्यवहार झाल्याचे ऑडिटरने स्पष्ट केले. मुदतीत रक्कम भरली नाही म्हणून ऑडिटरने तुमच्या कार्यकर्त्यांविरूद्ध फिर्याद दिली. त्यास महाजन जबाबदार कसे? असा सवाल भाजपने केला.

बीओटी व्यापारी संकुलाच्या एनओसीबाबत विचारणा करताच प्रक्रिया सुरू आहे, असे अॅड. शिवाजी सोनार यांनी स्पष्ट केले. पालिकेविषयीच्या आरोपांनी गट नेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, प्रा.शरद पाटील यांनी उत्तरे दिली. शहरातील खुल्या भूखंडांवर महाजन यांनी उद्याने विकसीत केली. मंगलकार्यालये बांधल्याचे सांगितले.

बीएचआरची ५० कोटींची जमीन आमदार महाजन यांनी केवळ २ कोटीत घेतली. ती मी १५ कोटींना घेण्यास तयार असल्याचे आव्हान ललवाणी यांनी दिले होते. त्यावर आम्ही तयार आहोत. ललवाणींनी ती जमीन खरेदी करावी, असे प्रतिआव्हान बाविस्कर यांनी दिले. ललवाणी यांचे सर्व धंदे जामनेरकरांनी पाहिले आहेत, असाही आरोप बाविस्करांनी केला.

साधना महाजन यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात ४१ टक्क्यांपर्यंत वाढीव दराने निविदा दिल्याचे आरोप ललवाणी यांनी केले होते. मात्र, करंट डीएसआरनुसार योग्य दराने निविदा दिल्या. उलटपक्षी ललवाणी यांच्या काळातील ऑडिटमध्येच वसुलपात्र रक्कम दिसून येते. ती न भरल्याने त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल झाला होता, असे भाजप पदाधिकारी म्हणाले.