रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळला युवक

Jalgaon Jalgaon MIDC अपघात क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगरमधील स्मशानभूमीच्या बाजूला रेल्वे रुळावर अनोळखी युवक जखमी अवस्थेत आढळून आला आहे. एका पत्रकारासह नागरिकांनी उपचारासाठी त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचवले.

शिवाजी नगरमधील रेल्वे रुळावर शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अनोळखी युवक जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या मदतीसाठी ये-जा करणारे नागरिक जात नव्हते. त्यावेळी तेथून जात असलेले पत्रकार जकी अहमद यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका लवकर न आल्याने ट्रॅक-मन नवाज अली, अरबाज खान, शोएब अली, जुबेर शेख यांनी रिक्षाचालक तुषार ठाकरे यांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्या युवकाला दाखल केले.

डॉक्टरांनी जखमीवर तत्काळ उपचार सुरु केले. त्या युवकाच्या डोक्याला, चेहऱ्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तो रेल्वेतून पडला की त्याला कुणी मारले, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्या युवकाची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशीरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.