जळगावात मंडप व्यावसायिकाने केली आत्महत्या ; मुलीलाच दिसला गळफास घेतलेल्या अवस्थेत पिता!

क्राईम

जळगाव >> शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मंडप व्यावसायिक संतोष पाटील (वय ४०) हे झोपेतून उठले. आंघोळीसाठी त्यांनी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. दरम्यान रिंग वाजल्याने मोबाईल सोबत घेऊन वरच्या मजल्यावर गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते खाली न आल्याने त्यांची मुलगी प्रियंका ही त्यांना बोलविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता तिला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. यांनतर तिने हंबरडा फोडला अन् आरडाओरड केली त्यानंतर हा प्रकार समोर आला. कुटूंबातील व्यक्तींना या घटनेमुळे जबर धक्का बसला. गल्लीतील महिला नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच संतोष यांचे मोठे बंधू राजेंद्र पाटील, लहान बंधू किशोर पाटील यांच्यासह कुटूंबातील सदस्य असोदा येथून घटनास्थळी आले. तत्पूर्वी संतोष यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता डाँक्टरानी मृत घोषित केले.

व्यवसाय बंद असल्याने होते चिंताग्रस्त
नातेवाइकांच्या दिलेल्या माहितीनुसार, संतोष पाटील यांचा टेन्ट हाऊस चा व्यवसाय होता. लग्न समारंभ, सत्कार यांच्यासह विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी ते मंडप, गाद्या, भांडे इत्यादी साहित्य तसेच सुविधा पुरवीत असायचे. त्याच्यावरच ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान कोरोनो व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उद्योग, व्यवसाय, कंपनी इत्यादी ठिकाणी काम थांबले आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ही बंद होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून संतोष पाटील (माळी) हे चिंताग्रस्त होते. संतोष यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगी प्रियंका, मुलगा गौरव, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. मृत संतोष हे मनमिळावू व कोणाच्याही मदतीला धावून जात असायचे. त्यांच्या अकस्मात मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *