जळगाव जिल्ह्यात आजपासून मिळणार घरपोच मद्य सेवा !

Jalgaon ऑनलाईन-बिनलाइन जळगाव

जळगाव : घरपोच मद्यासाठी १४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश जारी केलेला आहे. ज्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्याचा परवाना आहे, अशाच व्यक्तीला मद्य मिळणार आहे. प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणच्या बियर बारमधील मद्याचा शिल्लक साठा विक्रीस जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून परवानगी दिली आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच मद्यही आजपासून मिळणार आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात मात्र कुठलेही नियम शिथील केलेले नाहीत. तेथे मद्यविक्री बंदच राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश जारी केले.

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस काही निर्बंध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्रेमींसाठी मंगळवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. दरम्यान, जळगाव महापालिका व इतर नगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून इतर ठिकाणी वाईन शॉप, बियर शॉप चालकांना दुकानावर मद्य विक्री करता येणार नाही, केवळ ग्राहकांना ऑनलाईन घरपोच सेवा द्यायची आहे. तर परमीट रुम चालकांना कांऊटरवरुन सीलबंद बाटली विक्री करता येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

लॉकडाउन काळात परमीट रुम व बियर बारमधील अर्थात २४ मार्चपासून सील केलेला मद्यसाठा विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मद्यसाठा विक्री करताना बारमध्ये बसून मद्यप्राशन करण्यास मात्र मनाई आहे. केवळ शिल्लक साठा ग्राहकांना विक्री करायचा आहे. ही परवानगी शिल्लक असलेला मद्यसाठा विक्री होईपर्यंतच आहे. मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लॉकडाउन कालावधी यापैकी जे अगोदर होईल, त्यासाठी लागू राहील. मद्यविक्री करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घेणे परवानाधारकांना बंधनकारक राहणार आहे. याच काळात परमीट रुमधारक बियर साठा बियरशॉपी चालकास विक्री करू शकणार आहे, ती मात्र एकदाच करता येणार आहे. नवीन मद्यसाठा आणून त्याची विक्री करता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *