जळगाव ::> जुन्या जळगावात तेली गल्लीतील किराणा दुकानात बनावट आयडीच्या आधारे ई-रेल्वे तिकिटांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यावर गुरुवारी दुपारी १ वाजता लोहमार्ग पाेलिस, क्राइम व कमर्शियल विभागाच्या पथकांनी धाड टाकली. यात अवैधरीत्या रेल्वे ई-तिकिटांची विक्री केल्याप्रकरणी युवकाला लॅपटॉप व दोन मोबाइलसह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, युवकाने लाखो रुपये किमतीचे २३५ तिकिटे विक्री केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पंकज आनंदा बारी (वय ३२, रा. तेली गल्ली, जुने जळगाव) असे लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. जळगावात बनावट आयडीच्या आधारे रेल्वेच्या तिकिटांची विक्री होत असल्याचे रेल्वेच्या सायबर सेलला आढळून आले होते. त्याबाबत त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांना कळवले होते.
गुरुवारी दुपारी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सी. एस. पटेल, उपनिरीक्षक जी. एम. भेगे, एस. जी. शिंदे, प्रमोद सांगळे, क्राइम ब्रँच भुसावळचे उपनिरीक्षक एस. बी. गुप्ता, समीर तडवी, कमर्शियल विभागाचे ए. एस. राजपूत, प्रशांत ठाकूर यांनी जुन्या जळगावातील तेली गल्लीतील संदीप किराणा दुकानावर धाड टाकली. त्यामध्ये पंकज बारी या युवकाला लॅपटॉप व दोन मोबाइलसह ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. त्याच्या लॅपटॉपमधील आयडीच्या आधारे सायबर सेलने विक्री केलेल्या ई-तिकिटांबाबत माहिती शोधली.
बारीने बनावट आयडीच्या आधारे लाखो रुपये किमतीच्या २३५ रेल्वे तिकिटांची विक्री केल्याचे आढळून आले. बारी याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिसामध्ये रेल्वे अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग ठाण्याचे निरीक्षक सी. एस. पटेल यांनी सांगितले.