Jalgaon News : २५ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना…

Jalgaon जळगाव माझं खान्देश

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव > कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत २५ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या अहवालात परीक्षा आयोजनासंदर्भातील शिफारशींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.या अहवालातील शिफारस क्रमांक ८ नुसार कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे.

परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य मिळण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय उपलब्ध करून द्यावी असेही म्हटले आहे. त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा पी.पी.पाटील यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना उद्भवणार्या शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत तिन जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये हे कक्ष स्थापन केले असून संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाकडे समन्वय म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर महाविद्यालयाची यादी देण्यात आली आहे. या यादीत महाविद्यालयांतर्गत येणारे तालुके आणि विद्याशाखा तसेच समन्वयकाचे नाव, मोबाईल क्रमांक व ई- मेल नमुद करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे संपर्क साधावयाचा आहे. दरम्यान विद्यापीठात स्थापन केलेल्या कक्षाचे कामकाज सोमवार पासून सुरू झालेले असून गेल्या चार दिवसात ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दूरध्वनी व ईमेल द्वारे आपल्या शंका विचारल्या.

या शंकांचे निरसन करण्यात आले व आता सविस्तर उत्तरे देखील तयार केली जात आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून सदस्य म्हणून प्रा.किशोर पवार, प्रा.समीर नारखेडे, प्रा.अजय पाटील, प्रा.नवीन दंदी, प्रा.उज्वल पाटील हे काम पहात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *