Jalgaon News : जळगावात चहापावडरमध्ये तंबाखुची तस्करी

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव > ”लॉकडाउन” शिथिल होताच दारूपाठोपाठ गुटखा, तंबाखूची तस्करी वाढली आहे. नवीपेठेतील ‘अभिनंदन ट्रेडर्स’ बाहेर उभ्या मिनीट्रकवरील चालकाने तोंडाला मास्क का लावला नाही, याची विचारणा करताना संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तसेच झडती घेतल्यावर मिनीट्रकमध्ये तब्बल साडेतीन लाखांची तंबाखू चोरट्याच्या मार्गाने आणल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकसह माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाउन असल्याने गुटखा, तंबाखूची दहापट दराने काळ्या बाजारात विक्री होत आहे. दहा रुपयांची तंबाखू पुडी पन्नास रुपयालाही मिळेनाशी झाली आहे. “लॉकडाउन’ शिथिल होताच अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली तंबाखू गुटख्याची तस्करी सुरू झाली असून, शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने तोंडाला मास्क न लावलेल्या वाहनचालकाला पकडल्यानंतर गाडीची तपासणी केली. त्यात साडेतीन लाखांची तंबाखू मिळून आली. सोबत 27 हजारांचा चहा आणि वाहन असा एकूण 5 लाख 70 हजारांचा ऐवज शहर पोलिसांनी जप्त करून चालक मोहम्मद रफिक मोहम्मद अहमद (वय 57, रा. उत्राण, ता. एरंडोल) याला ताब्यात घेतल्यावर त्याने दिलीप कांतिलाल जैन (रा. गणेश कॉलनी) याचे वाहन असल्याचे पोलिसांना सांगितले.

लॉकडाउन उल्लंघनाचा गुन्हा
सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, संतोष केंद्रे, रतन गीते, अक्रम शेख, सुधीर साळवे नियमित गस्तीवर असताना त्यांना नवीपेठेतील “अभिनंदन ट्रेडर्स’समोर निळ्या रंगाची मिनीट्रक उभी असल्याचे आढळून आले. चालक मोहम्मद रफिक याने तोंडाला मास्क लावला नसताना त्याची चौकशी करत असताना गाडीत तंबाखू आणि चहा पत्ती असा माल आढळून आला. संतोष केंद्रे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चहापावडरमध्ये तंबाखू
पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमध्ये 70 हजारांची 28 पोती तर चहापावडर खाली साडेतीन लाखांची तब्बल 84 पोती तंबाखू लपवून तस्करीच्या मार्गाने जळगावात आणली गेली. आस्थापना बंद असल्याने शहरात दहा पट जास्तीच्या किमतीने तिची विक्री होणार होती. चालकाने गाडी मालकाचे नाव सांगितले. मात्र, साडेतीन लाखाच्या तंबाखूचा मालक कोण हे, तो सांगू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *