जळगाव ::>अॅमेझॉनवरून ऑनलाइन प्रिंटर मागवल्यानंतर बिलाबाबत कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीच्या नावाने बिल देतो सांगून एका भामट्याने आदर्शनगरातील युवकाची १ लाख १० हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सोमेश दिलीपकुमार तलरेजा या युवकाने अॅमेझॉनवरून संगणकाचे प्रिंटर ऑनलाइन मागवले होते. प्रिंटरसह बिल बहिणीच्या नावाने आल्यामुळे ते बिल वडिलांच्या कंपनीच्या नावाने मिळण्यासाठी सोमेशने अॅमेझॉनच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. वडिलांच्या कंपनीच्या नावाने बिल देण्याची मागणी केली. फोन ठेवताच तात्काळ त्याला फोन आला. तुम्हाला कंपनीच्या नावाने बिल हवे आहे. त्यासाठी फोन पे ॲपवरून आधी दहा रुपयांची रक्कम पाठवण्यास सांगितले. त्याला युपीआय क्रमांकही विचारला. काही वेळानंतर युवकाच्या बँक खात्यातून १ लाख १० हजार रुपयांची रक्कम बिलाच्या नावाखाली भामट्याने काढून घेत फसवणूक केली.