जळगाव मनपात राजकीय भूकंप, सत्ताधारी भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीला 4 दिवस शिल्लक असतानाच जळगावात राजकीय भूकंपाचे चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा सुरू आहे. भाजपमधील काही सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

भाजपकडून व्हीप जारी करण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसेच महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नावही निश्चित केले आहे.जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहूमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तर 18 मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर रवाना झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शिवसेनेकडून महापालिकेवर भगवा फडकवला जाण्याची शक्यता शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

पालकमंत्र्यांचा फार्महाऊसवरुन सुत्रे हलली?

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी केवळ 4 दिवस शिल्लक असतानाच शिवसेनेने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. रविवारी दुपारी 2 वाजेपासून भाजपचे 27 नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर एकत्र जमल्याची माहिती सुत्रांनी दिली. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्रे हलली असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

भाजपमध्ये धुसफूस
महापालिकेत भाजपचे बहुमत असले तरी पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ते भाजपविरोधात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीतच आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. पण महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी मध्यंतरी खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नॉट रिचेबल होण्यामागे खडसे यांचाही हात असल्याची चर्चा सध्या जळगावात सुरू आहे.