वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करून गुन्हा दाखल करा : काँग्रेसची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> महापालिकेने स्वच्छतेसाठी वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून गुन्हा दाखल करावा. तसेच शहरातील साफसफाईचा ठेका रद्द करावा, अशी मागणी शहर काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीचा शहरात ठेका सुरू झाल्यापासून कामाबाबत असमाधान व्यक्त करत तक्रारी करण्यात आल्या आहेत. अवघ्या सहा महिन्यात ठेकेदाराने काम बंद केले होते. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट २०२० पासून कामाला सुरुवात केली आहे.

बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबवले होते. त्यात उद्योजक सुनील झंवर यांच्याकडे वॉटरग्रेस कंपनीचे दस्तऐवज सापडले असून एटीएम मिळून आले आहेत. झंवर हे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी देखील नाहीत त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

सफाईचा ठेका हा साई मार्केटिंगकडून चालवला जात असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे घोडेस्वार यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची व ठेक्याशी संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

वॉटरग्रेस कंपनीने महापालिकेसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून ठेका पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करत अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी घोडेस्वार यांनी केली आहे.