आजपासून शासकीय रुग्णालयात नॉन कोविड उपचार सुरू

जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांनंतर ३०० खाटांवर नॉन कोविड रुग्णांसाठी गुरुवारपासून सुविधा पूर्ववत करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ओपीडी सुरू राहील. त्याचप्रमाणे गुलाबराव देवकर महाविद्यालयातील अपघात विभागही शासकीय रुग्णालयात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड व कोविड संशयित रुग्णांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी राऊत यांनी बुधवारी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील, महाविद्यालयाचे जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक नागोजी चव्हाण उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी सांगितले की, दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; पण सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या व मृत्यू संख्या कमी झालेली आहे. सद्य:स्थितीत ६५ संशयित रुग्ण दाखल आहेत. नॉन कोविड सुविधा पूर्ववत करण्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रस्ताव आला होता. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड रुग्णांसाठी १२५ बेड ठेवण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुविधांमध्ये वाढ झाली आहे. पुरेसे डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश व्यवस्था, निर्जंतुकीकरण आदी सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली.