Jalgaon News : जनता कर्फ्यू’चा दुसऱ्या दिवशीही फज्जा… मेडिकल दुकाने “बंद’मुळे रुग्णांचे हाल

Jalgaon जळगाव

जळगाव > शहरात विविध राजकीय पक्षांनी कालपासून सुरू केलेला “जनता कर्फ्यू’चा आज दुसऱ्या दिवशीही फज्जा उडाल्याचे दिसून आले. नागरिक विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसून आले. विविध राजकीय पक्ष, प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन करूनही नागरिक गर्दी कमी करीत नसल्याचे चित्र आहे. उलट शहरात काय सुरू आहे, काय बंद आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम काही जण घराबाहेर पडताना दिसत आहेत.

कोरोना’चा धोका शहरात दिवसागणिक वाढत असताना गर्दीत जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, त्याला नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. शहरातील काही दुकानदारांनी “जनता कर्फ्यू’ पाळला असला, तरी अत्यावश्‍यक दुकानांसह इतर काही दुकानेही सुरूच आहेत. भाजीपाला, फळबाजार सुरूच आहे. तेथे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते. वास्तविक “जनता कर्फ्यू’चा अर्थ नागरिकांनी स्वतःला घरातच ठेवणे, घराबाहेर न पडणे. यामुळे “कोरोना’ची साखळी तुटून रुग्णसंख्या कमी होईल. मात्र, याकडे नागरिक गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

मेडिकल दुकाने बंदच
“कोरोना’चा संसर्ग असला, तरी मेडिकल दुकाने बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाहीत. मात्र, तरीही शहरातील अनेक मेडिकल दुकाने बंदच आहेत. त्यामुळे रुग्णांना औषधी मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्ण औषधांसाठी इतरत्र भटकंती करीत आहेत. कोणाच्या आदेशावरून मेडिकल दुकाने बंद ठेवली जात आहेत कुणास ठावूक. मेडिकल दुकानदारांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *