आरोग्य विभागाच्या परीक्षेला चार हजार उमेदवारांची दांडी

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील १० केंद्रांवर २५२२ उमेदवारांनी सोडवला पेपर

प्रतिनिधी जळगाव >> आरोग्य विभागातर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी होणारी भरती परीक्षा रविवारी संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात १० केंद्रांवर ही परीक्षा झाली. या वेळी तब्बल ४२९४ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली तर २५२२ उमेदवारांनी परीक्षा दिली. उमेदवारांची सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग करून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला होता.

राज्यातील आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांसाठी २०१९मध्ये जाहिरात निघाली होती. या पदभरतीला तब्बल दीड वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे. रविवारी जिल्ह्यातील हिवताप विभागाच्या ५९ पदांसाठी १० केंद्रांवर परीक्षा झाली. २०१९ साली ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांनाच या परीक्षेला बसता आले. सकाळी ९ ते १२ या वेळेत ही परीक्षा झाली. परीक्षेचे संपूर्ण नियोजन एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. फक्त सुपरव्हिजन करण्याची भूमिका शासनाची होती. जिल्ह्यात सुमारे ६ हजार ८१२ परीक्षार्थी परीक्षा देणार होते; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि उशीर झालेल्या या भरती परीक्षेला ४२९४ उमेदवारांनी दांडी मारली. जिल्ह्यातील १० केंद्रांवर ही परीक्षा झाली असून, त्यापैकी पाच केंद्र हे जळगाव शहरातील होते. दरम्यान, ‘कोविड-१९’च्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला.

जिल्ह्यात या केंद्रांवर झाली परीक्षा
आरोग्य विभागातील गट-क संदर्भात झालेली परीक्षा जिल्ह्यातील जी. एच. रायसोनी कॉलेज, मधुकरराव चौधरी कॉलेज खेडी, अॅड. सीताराम बाहेती कॉलेज जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय जळगाव, बियाणी इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, वाय. सी. एस. पी. मंडळ पब्लिक स्कूल एरंडोल, वाय.सी. एस. पी. मंडळ डीडीएसपी कॉलेज एरंडोल, बोहरा सेंट्रल स्कूल श्रीनाथजीनगर, पारोळा तालुका, प्रताप कॉलेज अमळनेर, केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज या १० केंद्रांवर जिल्ह्यात परीक्षेसाठी बैठकव्यवस्था केली होती.