जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं ; रुग्णांची संपूर्ण रात्र रस्त्यावर

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> मुसळधार पावसामुळे काल रात्री गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु आहे. तरीदेखील आरोग्य यंत्रणा कमी पडताना दिसली. रुग्णालयाच्या तळमजल्यात पूर्णपणे पाणी शिरल्याने या वॉर्डातील रुग्णांना संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली.

गोदावरी रुग्णालयाच्या आजूबाजूला डोंगर आहेत. काल रात्री जळगावात मुसळधार पाऊस पडला. यावेळी डोंगरावरुन येणारं पाणी रुग्णालयात शिरलं. त्यामुळे गोदावरी रुग्णालयाची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दरम्यान, रुग्णालयात पाणी शिरल्याने एक व्यक्ती रुग्णाला स्ट्रेरने रुग्णालयातून बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयात पाणी शिरलं असताना पोलीस प्रशासन आणि आरोग्य अधिकारी यांपैकी कुणीही रुग्णालयात आलं नाही. सध्या या रुग्णालयातील पाणी ओसरलं आहे. मात्र, रुग्णालयाची परिस्थिती भयानक आहे. रुग्ण ओरडत आहेत. कुणाची गादी, कपडे तर कुणाचे पैसे ओले झाले आहेत.

जळगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा सुरुवातीला सरकारने या रुग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या रुग्णालयात 50 टक्के कोरोनाबाधित तर 50 टक्के तर इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वॉर्डबॉयची रुग्णांना मदत >> मुसळधार पावसामुळे रुग्णालयाच्या तळमजल्यात सर्वत्र पाणी साचलं. मात्र, यावेळी रुग्णालयाच्या वॉर्डबॉय रुग्णांना धीर देत होते. ते जसं जमेल तसं रुग्णांना बाहेर काढत होते. रुग्ण घाबरुन जावू नये याची काळजी घेत होते. मात्र, रात्रभर रुग्णांचे हाल होत असताना एकही डॉक्टर किंवा पोलीस आले नाहीत, अशी तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *