जळगाव >> आशाबाबानगर येथे २३ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बेकायदेशीरपणे डीजे वाजवल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत डीजे जप्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये असे स्पष्ट आदेश असताना नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. २३ रोजी रात्री आशाबाबानगर येथे बापूराव श्रावण पाटील यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात शालिक देविदास कोळी (रा. हिंगोणे सिम जळोद, ता. अमळनेर) याचा डीजे होता. या परिसरात धिंगाणा सुरू असल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, वासुदेव मोरे, रेवानंद साळुंखे यांच्या गस्ती पथकाने तेथे धाव घेतली. पाटील यांच्या घरासमोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तसेच या ठिकाणी एमएच- ४३, एडी-१७५ या क्रमांकाच्या वाहनावरील डीजे वाजत होता.
१०० ते १५० तरुण गर्दी करून नाचत होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत परवानगी नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस कर्मचारी विनोद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील व डीजे मालक शालिक देविदास कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ललित भदाणे तपास करीत आहेत.