जळगावात तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी तवा

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> खेडी गावात अंडापाव विक्रेता व ग्राहक यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादात भुर्जी विक्रेत्याने थेट तरुणाच्या डोक्यात भुर्जीचा लोखंडी तवा मारला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता खेडीत घडली.

सुबोध अवचित वानखेडे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुबोध वानखेडे हा २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील शाळेजवळ असलेल्या अंडापाव विक्री करणाऱ्याकडे गेला होता.

तेथे त्याने अंडाभुर्जी पार्सल मागितले; परंतू विक्रेता भूषण संजय शिरसाठ याने नंतर येणाऱ्या ग्राहकांना पार्सल दिले. याचा जाब विचारला असता दुकानदार भूषण शिरसाठ याने सुबोध याला शिवीगाळ करून मारहाण केली.

अंडाभुर्जी बनवण्याचा लोखंडी तवा सुबोधच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. भूषणच्या आईने देखील सुबोधला मारहाण केली. या मारहाणीत सुबोध बेशुध्द झाला होता.

नातेवाइकांनी जखमीवस्थेत त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सुबोध याने दिलेल्या फिर्यादीवरुन भूषण व त्याच्या आईविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.