‘मला तु खूप आवडेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघं पळून जावू’ असे म्हणत केली जबरदस्ती ; गुन्हा दाखल

Jalgaon क्राईम

जळगाव >> एकतर्फी प्रेमातून 28 वर्षीय विवाहितेला घरातून पळून जाण्यासाठी जबरदस्ती व घरात घुसून अंगलट करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. खुशाल मराठे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे त्या संशयित आरोपीचे नाव असून तो मोबाईल दुरुस्तीचे काम करतो.

पीडित महिला पती व 3 मुलांसह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. पीडितेचा पती बांधकामावर मजुरीने कामाला जातो. पीडित व खुशाल मराठे याची मोबाईल दुरुस्तीच्या निमित्ताने 6 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. पीडिता मुलीसह घरात असताना तेथे खुशाल मराठे आला. ‘मला तु खूप आवडेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघं पळून जावू’ असे तो पीडितेला सांगायला लागला. पीडितेने मी तुझ्या समाजाची नाही, त्याशिवाय माझे लग्न झालेले आहे, असे सांगून तु येथून निघून जा म्हणून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने जबरदस्तीने अंगलटपणा करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण पळून जावू, लग्न करु असे’ तो पुन्हा सांगू लागला. त्यावर पीडितेने त्याला धक्का मारून लांब केल्यावर खुशाल याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने त्याला धक्का मारुन घरातून पलायन केले. दरम्यान, हा प्रकार झाला तेव्हा घर मालक व मालकीन हे देखील उपस्थित होते.

पती कामावरुन आल्यानंतर पीडितेने त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गाठून घटनाक्रम कथन केला. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडित महिलेची तक्रार घेऊन संशयिताविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनीही पीडितेकडून माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *