दारूच्या नशेत बायकोवर पतीचा कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

Jalgaon Jalgaon MIDC अपघात क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील फुफनी येथे घडली.

नंदा प्रकाश पाटील (वय ३५) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिला ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुफनी येथे प्रकाश पाटील हे पत्नी नंदा व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. प्रकाश पाटील हे यांना दारुचे व्यसन आहे.

यावरुन त्यांचे व पत्नी नंदा यांच्यासोबत नेहमीच खटके उडून वाद होतात. आज रविवारी दुपारी नंदा व दोन मुले घरी होते. यावेळी प्रकाश पाटील हे मद्यप्राशन करुन आले.

यावेळी नंदा पाटील यांनी त्यांना दारु का पितात, असे म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून मद्याच्या नशेत असलेल्या प्रकाश पाटील यांचा राग अनावर झाल्याने घरातील कुर्‍हाडीने पत्नी नंदा हिच्या डोक्यात वार केले.

यावेळी घरातील दोन्ही मुले भितीने, गावात असलेल्या त्यांच्या काकाच्या घरी धावत गेले. यानंतर प्रकाश पाटील यांच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी घराकडे धाव घेतली.

रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या नंदा पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान नंदा पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्या बेशुध्दच असून त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत कार्यवाही सुरु केली आहे.