कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक : खा. रक्षा खडसे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> यंत्रणांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पार पडली, खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या की, कोरोनामुळे मागील काळात लॉकडाऊनमुळे विविध विकास कामे करता आली नाही. परंतु आता कामांना गती देऊन शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत व या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच सूचनाही त्यांनी दिल्यात.

जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गती वाढवा. जिल्ह्यातील ज्या नगरपालिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी प्राप्त झाला नसेल त्याची माहिती द्यावी, हागणदारीमुक्त गावांमध्ये नागरीक उघडयावर शौचास जातात हे योग्य नसून स्वच्छ भारत योजनेत वैयक्तिक शौचालयांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांची कामे करावीत.

कोरोनामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच खाजगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीची बिलांची आकारणी करीत आहे. कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरीकांची लुट होणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा मुबलक राहील याचीही यंत्रणेने दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे कोरोना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, कोविड उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. या बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, रोजगार हमी योजना अमृत योजनांसह दूरसंचार, रेल्वे, खणीकर्म या मुलभूत सुविधा आदिंचाही आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *