जिल्हा रुग्णालयात आशा वर्कर महिलेने वॉर्डबॉयची केली चपलेने धुलाई

Jalgaon क्राईम जळगाव निषेध

जळगाव प्रतिनिधी ::> वाईट विचाराने महिलांना दुपारच्या वेळी घरी आणण्यासाठी घराच्या चावीची मागणी करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्डबॉयची आशा वर्करने चपलेने धुलाई केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजता सिव्हिलमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत घडली. याप्रकरणी आशावर्कर लक्ष्मी सुरेश पवार यांनी वॉर्डबॉय किरण मधुकर दुसाने व स्वच्छता निरीक्षक बापू नारायण बागलाने या दोघांची कसून चौकशी करण्याबाबतची तक्रार अधिष्ठाता कार्यालयाकडे बुधवारी दिली आहे.

ममुराबाद येथील आशावर्कर व शबरीमाता भिल्ल समाज संस्थेची जिल्हाध्यक्ष लक्ष्मी सुरेश पवार या संस्थेच्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी सिव्हिलच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास वॉर्डबॉय किरण दुसाने हे १४ नंबर आायसीयूमधून ड्यूटी संपवून घरी जात असताना त्यांना अडवून आशावर्कर लक्ष्मी पवार यांनी मारहाण केली. या वेळी गेटवर ड्यूटीवर असलेल्या पोलिस व सुरक्षा रक्षकांनी किरण दुसाने यांची महिलांच्या तावडीतून सुटका केली.

अधिष्ठाता यांना दिलेल्या तक्रारीत पवार यांनी म्हटले की, किरण दुसाने व बापू नारायण बागलाने हे दोघे एक महिन्यापासून सोबत अनोळखी महिलांना घेऊन दुपारी जेवणानंतर तुमच्या घरी येऊ असे सांगतात. तुमच्या घराची चावी द्या, या मागणीसाठी दीड महिन्यात ८ ते १० वेळा फोन केले. त्यावर नकार दिला असता दोघांनी फोनवर शिवीगाळ करून अश्लील भाषेत बोलले. तसेच तीन वर्षांपासून ब्लडप्रेशर आजाराच्या गोळ्या सुरू असून, हे दोघे ४० रुपये घेऊन या गोळ्या देतात. त्यांचे ऐकले नाही म्हणून २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेनंतर फोन करून शिवीगाळ केली व गोळ्या देण्यासही नकार दिला. या दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी पवार यांनी तक्रार अर्जात केली आहे.