जळगावात ४ लाखांचे सिगारेटचे खोके चोरणाऱ्या कामगारास अटक

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> भजे गल्लीतील एजन्सीतून ३ लाख ९० हजारांचे सिगारेट खोके चोरीप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हापेठ पोलिसांनी एजन्सीतच काम करणाऱ्या कामगाराला अटक केली.

सागर जयंत पाटील (वय २४, रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर) अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. दादावाडी परिसरातील वृद्धांवन कॉलनीतील रामचंद्र पुंडलिक पाटील यांचे भजे गल्लीतील चोपडा मार्केटमध्ये भारद्वाज एजन्सी नावाचे सिगारेट विक्रीचे दुकान आहे.

रामचंद्र यांच्याकडे सागर पाटील हा युवक कामगार काम करीत होता. पाटील यांनी सिगारेट विक्रीची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. सागर पाटील याने ३० जून ते १९ ऑक्टोंबरपर्यंत एजन्सीतून सिगारेटचे एकूण ३ लाख ९० हजाराचे १९० खोके त्याने लंपास केले. दरम्यान, खरेदी-विक्रीची वहीमध्ये दररोज मालाची नोंद केली जात होती.

सागरने नोंद वहीत खाडाखोड केली. तसेच पुरावा मिळू नये म्हणून वही फेकून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर पाटील व जयंत पाटील याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.