‘आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी २०२८मध्ये घरी परत येईन’ अशी चिठ्ठी लिहून अल्पवयीन मुलाची घरातून पळ

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील निमखेडी शिवारातील दिव्यजोती वाटिकाश्रम परिसरात राहणारा एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला. घरातून निघून जाण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, रडूही नका. मी २०२८ मध्ये परत येईन.’ असा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहिला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलगा शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. तो १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेदरम्यान घरातील कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. तो सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारची माहिती देत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून निघून जाण्यापूर्वी त्या मुलाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. अभ्यासाच्या टेन्शनमुळे मी घरातून जात नाहीये. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, रडूही नका. मी २०२८ मध्ये परत येईन.’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला आहे. ही चिठ्ठी तपासकामी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्या मुलाने त्याच्याकडील मोबाइलमधील दोन्ही सिमकार्ड काढून घरातच ठेवले आहेत. सिमकार्डविना असलेला मोबाइल मात्र तो आपल्या सोबत घेऊन गेला आहे. मोबाईलमधील सिमकार्ड काढून ठेवत असल्याचा उल्लेखही त्याने चिठ्ठीत केला आहे. मात्र, कुणी तरी त्याला फूस लावून पळवून नेले असावे असा त्याच्या पालकांना संशय आहे.