मनपाकडून १० ते १३ जानेवारी दरम्यान होणार तपासणी

जळगाव >> मनपाने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ ची तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने शहरातील नागरिकांत जनजागृती करण्याच्या हेतूने शासकीय व व्यावसायिक आस्थापनांची १० ते १३ जानेवारी दरम्यान स्वच्छता स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आस्थापनांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिली.

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव शहराने ५५ वा क्रमांक पटकावला आहे. येत्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ या स्पर्धेसाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. शहरातील कचरामुक्त कॉलन्यांचा अभियान राबवले आहे. यात आतापर्यंत २१० कॉलन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाला बळकटी मिळावी यासाठी आता महापालिकेने शहरातील शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, हॉटेल्स व व्यापारी संकुलांसाठी ही स्पर्धा होत आहे. १० ते १३ जानेवारी दरम्यान मनपाने ठरवून दिलेल्या निकषानुसार तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल.

स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी या निकषांवर प्रामुख्याने भर द्यावा लागणार
मनपाकडून तपासणी करताना काही निकष जाहीर करण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वच्छता सुशोभिकरण करणे, स्वच्छतागृह स्वच्छ असणे, कंपोस्ट खतनिर्मितीची व्यवस्था करणे, शैक्षणिक संस्थांत स्वच्छता समितीची स्थापना करणे बंधनकारक राहणार आहे.

हॉटेल्समध्ये स्वच्छता तसेच स्वच्छतागृहांची उपलब्धता, स्वयंपाकी व वेटरकडून राखण्यात येणारी स्वच्छता, वाया जाणाऱ्या अन्न व इतर वस्तूंवर प्रक्रिया केली जाते की नाही याची तपासणी होईल.

पिण्याचा पाण्याची व्यवस्था करणे. रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या आहेत की नाही?, स्वच्छतागृहांची उपलब्धता, रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते. स्वच्छतेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *