आजपासून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणार ‘हायवे मृत्युंजय दूत’

अपघात जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> रस्ते अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्चपासून ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजनेस सुरुवात होते आहे. या योजनेतील दूत अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणार आहेत.

देशात दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकदा अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडून राहतो.

मदतीची विनवणी करतो; परंतु उगीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा विचार करून कोणी मदत करत नाही.

हा प्रकार लक्षात घेऊन जखमींना योग्य आणि तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीच्या लोकांना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गावर ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.

अपघातग्रस्त नागरिकांना मदत करून त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या दूताच्या कामाची नोंद घेण्यात येणार आहे.

महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे, महामार्गावरच्या गावातील सेवाभावी व्यक्ती अशा लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच रुग्णालये व रुग्णवाहिकेचे नंबर उपलब्ध करून देऊन त्यांना हायवे मृत्युंजय दूत असे ओळखपत्र देखील दिले जाणार आहे.