…आणि संघाच्या केशव भवनमध्ये झाडू मारणारा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला !

Politicalकट्टा Social कट्टा इंडिया कट्टा जगाच्या पाठीवर ब्लॉगर्स कट्टा

अभिजीत दराडे : ११ जुलै १९४९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघवरील प्रतिबंध हटवण्यात आला. हा प्रतिबंध लागला होता तो महात्मा गांधींच्या हत्येनंतर, जेव्हा प्रतिबंध हटवला गेला तेव्हा जवळपास 20 हजार कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं होतं. तेव्हा सरसंघचालक होते ‘माधवराव सदाशिवराव गोळवलकर’ . एव्हाना त्यांना कळून चुकलं होत की संघाला देशाच्या अन्य राज्यात आपलं संघटन मजुबत करावं लागणार. यासाठीच महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना दुसऱ्या राज्यात प्रचारक म्हणून पाठवण्यास सुरवात झाली. असेच एक खटाव गावात जन्मलेले युवक होते लक्ष्मणराव इनामदार त्यांनी पुणे विद्यापीठातून विधी शाखेतून पदवी घेतली होती. त्यामुळे ते जेव्हा गुजरातमध्ये संघाचं काम करायला लागले तेव्हा तेथील संघाचे स्वयंसेवक त्यांना ‘वकील साहेब’ बोलत असे. गुजरातमध्ये म्हैसाना जवळ छोटस गाव आहे ‘वडनगर’ येथे एक शिक्षक होते ‘बाबूभाई नायक’ त्यांनी 1944 मध्ये प्रथम आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेची स्थापना केली. 1949 ला प्रतिबंध हटवल्यानंतर त्यांनी संघाचं काम सुरू ठेवलं. 1958 मध्ये प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार वडनगरला पोहचले याप्रसंगी एक विशेष शाखेचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी त्यांना बाल स्वयंसेवकांना संघाच्या प्रतिनिष्ठेची शपथ द्यायची होती. जेव्हा ते ही शपथ देत होते तेव्हा दुसऱ्या रांगेत होता एक 8 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव होतं ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’.

नरेंद मोदीं संघाशी जोडले गेले ते वर्ष होते 1958 चे. 6 भावंडात तिसऱ्या नंबरचे नरेंद्र , त्यांचे वडील दामोदरदास मोदी वडनगर रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते. नरेंद्र सकाळी वडिलांच्या कामात मदत करत आणि जेव्हा शाळेची घंटा होई तेव्हा आपली झोळी उचलून शाळेत जात. शाळा ही चहाच्या टपरीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती शाळेचं नाव होतं ‘भागवताचार्य नारायनाचार्य विद्यालय’, नरेंद्र मोदी हे शाळेत जेमतेम असे विद्यार्थी होते. तेव्हांच्या रीती रिवाजनुसार नरेंद्र मोदींचं लग्न कमी वयात झालं होतं. 18 वर्षाच्या वयात जेव्हा एकत्र राहण्याचे बोलणी सुरू झाली तेव्हा नरेंद्र मोदी घरातून पळून गेले. या घटनेचा उल्लेख त्यांचे भाऊ सोमाभाई मोदींनी कारवान मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत केला आहे ते म्हणतात ‘आम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हती की, नरेंद्र कुठे गेलेत. दोन वर्षांनंतर एक दिवस ते अचानक परत आले. आणि म्हणाले आता माझा सन्यास संपला आहे . मी आता अहमदाबादला जाणार आणि काकांच्या कँटीन मध्ये काम करून पैसे कमावणार’ .

नरेंद्र जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या आई हिराबेन यांनी पहिल काम केलं ते शेजारीच असणाऱ्या ब्राम्हणवाडा गावच्या चिमणभाईला निरोप पाठवण्याच. चिमनभाई यांची मुलगी जशोदाबेन यांच्याशी 14 वर्षाच्या वयात नरेंद्र मोदींच लग्न झालं होतं. आईला वाटलं ही एकत्र राहण्यासाठी योग्य वेळ आहे पण नरेंद्र मोदी लग्नासाठी तयार नव्हते. अशात ते पुन्हा एकदा घर सोडून निघून गेले. मात्र यावेळी घरच्यांना माहीत होतं नरेंद्र हिमालयात नाही तर अहमदाबादला त्याच्या काकांकडे गेले आहेत, जे तिथं बस स्थानक जवळ कँटीन चालवत होते. काही वर्षे तर नरेंद्र मोदींनी इथं काम केलं पण नंतर आपला स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. त्यांनी एक सायकल खरेदी केली आणि चहा विकायला लागले. चहा विकण्याचं त्याचं पहिल ठिकाण होत अहमदाबाद येथील गीता मंदिर. या मंदिराच्या गल्लीत स्वयंसेवकांच येणं-जाण असायचं. शाखेनंतर जेव्हा स्वयंसेवक जायचे तेव्हा नरेंद्र मोदींच्या चहाच्या ठेल्यावर नक्की थांबायचे कारण नरेंद्र मोदी सुद्धा संघाला जोडूनच होते.

हळू हळू नरेंद्र मोदी नामक युवकाबद्दल प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदारांना माहिती झाली. काही महिन्यानंतर नरेंद्र मोदींना त्यांनी संघाच्या मुख्यालयात म्हणजे ‘केशव भवन ‘ येथे येऊन राहण्याचं आमंत्रण दिल. 2009 साली प्रसिद्ध पत्रकार ए. बी कामात यांनी मोदींवर एक पुस्तक लिहिले होते. त्यात याबद्दल नमूद करण्यात आलाय की, नरेंद्र मोदी या घटने बद्दल म्हणतात की, इनामदार साहेबांनी मला बोलावलं, त्यावेळी केशव भवन मध्ये 10-12 लोक राहत असत मला त्या सगळ्यांची जबाबदारी दिली गेली. त्यांच्यासाठी नाष्टा तयार करायचा , केशव भवनची साफसफाई करायची , स्वतःचे आणि इनामदार साहेबांचे कपडे धुवायचे आणि इतर कार्यालयीन काम अस काम होत’ परंतु कार्यालय सांभाळायचं हे काम कधी संघटन सांभाळण्यात बदललं त्यासाठी आपल्याला काही वर्षे पुढे जात आणीबाणीच्या काळात जावं लागेल.

1974 मध्ये एल डी महाविद्यालयात खानावळीच्या बिलामध्ये झालेल्या वाढीविरोधात आंदोलन सुरू झालं होतं. या आंदोलनाच लोन संपूर्ण गुजरात मध्ये पोहचल. या आंदोलनाला ‘गुजरात नवनिर्माण’ आंदोलन म्हणून पाहिलं जातं. या आंदोलनामुळे चिमनभाई पटेलांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 1 वर्षाने निवडणूका झाल्या या निवडणुकांत सर्व विरोधीपक्ष एकत्र आले आणि बाबूभाई पटेल हे मुख्यमंत्री झाले. मग सुरू झाला ‘तो’ आणीबाणीचा काळ हा तोच काळ होता की जेव्हा देशातील सगळ्या राज्यातील मुख्यमंत्री इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्या समोर गुडघे टेकून ‘हुकूमत का हुकूम’ बजावत होते. तेंव्हा बाबूभाई पटेलांची गुजरात सरकार इंदिरा विरोधकांची शरणदाता बनली होती. अशात नरेंद्र मोदी जे तेव्हापर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम पाहायला लागले होते. आता त्याच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारी वाढली होती. त्यांचं काम काय होत तर आणीबाणीच्या काळात आणीबाणी विरोधातील प्रचाराचे देशातील वेगळवेगळ्या भाषेत पत्रकं छापत असत. याचा मुख्य मजकूर कुरिअर मधून गुजरातमध्ये येत असे. नरेंद्र मोदींच काम होत की या मजकुराच्या जास्तीत जास्त झेरॉक्स छापायच्या आणि सुरक्षित देशातील वेगवेगळ्या राज्यात जे आणीबाणी विरोधात भूमीगत कार्यकर्ते होते त्यांच्याजवळ सुरक्षित पोहच करणे. नरेंद्र मोदींनी हे काम अगदी चोख फत्ते केलं.

डिसेंबर 1976 मध्ये बाबूभाई पटेलांच सरकार पडलं आणि माधवसिंगांचं सरकार सत्तेत आलं. हे सरकार काही दिवस चाललं आणि आणीबाणी हटल्यानंतर जेव्हा निवडणूका झाल्या तेव्हा जनता पार्टीचे सरकार आले. आता संघाने आपल्या स्वयंसेवकांना नव्याने जबाबदाऱ्या देण्याचं ठरवलं आणि साहजिकच नरेंद्र मोदींच्या रुतबा आता वाढला होता. आता त्यांना संघ आणि संघाच्या दुसऱ्या संघटनांमध्ये समन्वय साधण्याची जबादारी दिली गेली. हीच ती वेळ होती जेव्हा नरेंद्र मोदी सरळ सरळ राजकारणाच्या संपर्कात आले. 1980 मध्ये नवी पार्टी उदयास आली भारतीय जनता पार्टी जनसंघाचे नवे संस्करण. माधवसिंग सोळंकींचा वेळ होता काँग्रेस यशाच्या शिखरावर होती. गुजरात मध्ये काँग्रेसला हटवणे मुश्किल झाले होते. याचकाळात गुजरात मध्ये एक आरक्षण विरोधी आंदोलन सुरू झालं होत. हे आंदोलन सुरू व्हायचं आरक्षण आणि सरकार विरोधात पण याचा अंत धार्मिक तणावात होत असे. 1982 मध्ये हे लोन सुरू झालं आणि 1985-86 मध्ये या आंदोलनाने एक मोठं स्वरूप धारण केल होत. याचदरम्यान, अहमदाबाद मध्ये जग्गनाथ रथ यात्रेदरम्यान मोठा धार्मिक तणाव पाहायला मिळाला. हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत होत्या. 1984 मध्ये तिकडं भारतीय जनता पार्टीचे 2 खासदारावर आले होते, आणि नव्याने आपले मापदंड ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या प्रथम भाषणात ज्या गांधीवादी समाजवादाचा उल्लेख केला होता त्यात भारतीय जनता पार्टीला आणि या पार्टीच्या जन्मदात्या संघाला आपला रस्ता काही मिळत नव्हता. तेव्हाच ठरलं की आता ‘हिंदुत्व’कडे परतायला हवं. गुजरातने सुद्धा हा निर्णय तत्परतेने स्वीकारला आणि संघाने अस ठरवलं की सरकार विरोधी सुरू झालेल्या आंदोलनात नरेंद्र मोदी हे भाजपचे संघटन मंत्री असतील, हे वर्ष होत 1987.

त्याकाळी गुजरात भाजपची मदार होती दोन मोठ्या नेत्यांवर एक म्हणजे केशुभाई पटेल आणि दुसरे म्हणजे शकरसिंग वाघेला. नरेंद्र मोदींकडे जबाबदारी होती की या दोन नेत्यांचे हात बळकट करायचे आणि या दोघांचा शिष्य बनून राहण्याची. यासाठी नरेंद्र मोदींनी जनयात्रा सुरू केल्या आणि आपण एक कुशल संघटक असल्याचं दाखवून दिलं. संघटन मंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी भाजपला प्रस्ताव दिला न्याययात्रा काढण्याचा याची रूपरेषा त्यांनी तयार केली आणि नेतृत्व सोपवलं केशुभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेलांकडे, त्यानंतर 1989 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप ने अजून एक रथ यात्रा काढली जिचं नाव होतं ‘लोकशक्ती रथयात्रा’ याचा फायदा असा झाला की भाजपला गुजरातच्या 26 पैकी 12 लोकसभा जागांवर विजय मिळवता आला. 1989 मध्ये व्ही.पी. सिंगांच्या नेतृत्वात राष्ट्रीय मोर्चाची सरकार होतं. या सरकारला वाम मोर्चा आणि भाजपचे समर्थन होते. जेव्हा व्ही.पी सिंग यांनी सामाजिक न्यायचा ‘मसिहा’ बनण्यासाठी मंडल कमिशन लागू करण्याचा निर्णय घेतला तर याच्या विरोधात भाजपने ‘कमंडल’चे राजकारण सुरू केलं. त्यासाठी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी सोमनाथ ते अयोध्या एक रथयात्रा काढली. ही रथयात्रा 12 सप्टेंबरला सुरू होणार आणि 30 ओक्टॉबरला संपणार होती. या रथयात्रेचे गुजरात मधील इंचार्ज होते गुजरात भाजपचे संघटनमंत्री नरेंद्र मोदी. 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरला रथयात्रा ठाण्याला पोहचेपर्यंत नरेंद्र मोदी या यात्रेचे इंचार्ज होते. या दरम्यान कोठेंही जातीय दंगल झाली नाही. या यात्रेचे यशस्वी नियोजनाचे बक्षीस मोदींना 2 वर्षांनी मिळाले.

1991 मध्ये काश्मीरमध्ये अलगाववादी आंदोलन जोरदार सुरू होत. या मुद्याला धरूनच 1992 साली भाजपने अजून एक रथयात्रा काढण्याचा निश्चय केला आणि याचे नेतृत्व होते ते त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मुरली मनोहर जोशी यांच्याकडे . भाजपने ठरवलं होतं की ते कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ‘एकतायात्रा’ काढणार ही यात्रा 16 राज्यांमधून जाणार होती आणि 26 जानेवारीला मुरली मनोहर जोशी श्रीनगर मधील लाल चौकात तिरंगा फडकवून या यात्रेचा समारोप करतील. या यात्रेच्या तयारीसाठी डिसेंबर 1991 ला भाजपने देशातील 50 नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली यामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा होते. त्यांचा सगळा अनुभव पाहता 47 दिवसांच्या या यात्रेचा त्यांना संयोजक बनवलं. 26 जानेवारीला मोठ्या सुरक्षेत मुरली मनोहर जोशींनी लाल चौकात तिरंगा फडकवला आणि बदामीबाग विमानतळावर आले. याठिकाणी ते पत्रकारांशी बोलणार होते. ते ज्यावेळेस पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला एक युवक बसलेला होता. आपलं बोलणं संपवून मुरली मनोहर जोशी त्या युवकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले ‘यांना भेटा हे आहेत नरेंद्र मोदी गुजरात वरून आलेत, खूप उर्जावन आणि मेहनती आहेत या सगळ्या यात्रेची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती.नरेंद्र मोदी हसत होते. राष्ट्रीय मीडिया समोर हा मोदींचा पहिला परिचय होता.’

रथयात्रेच्या यशस्वी नियोजनानंतर नरेंद्र मोदी गुजरातला आले आणि आपल्या कामात व्यस्त झाले. यादरम्यान त्यांची शंकरसिंह वाघेला बरोबर मतभेदाला सुरवात झाली. भाजपच्या संघटन मंत्र्यांच काम असत पक्षाच्या गोष्टी संघापर्यंत पोहचवणे आणि संघाच्या सूचना पक्षापर्यंत पोहचवणे. परंतु नरेंद्र मोदी आपल्या सीमा पार करून पक्ष संघटनेत हस्तक्षेप करू लागले होते. ही गोष्ट वाघेलांच्या अजिबात पचनी पडत नव्हती पण राज्यात पुढील एका वर्षात विधासभा निवडणूका होणार होत्या त्यामुळे अंतर्गत कलहाला वाघेलांनी महत्व दिल नाही. वाघेला आणि केशुभाईनां अस वाटत होत की नरेंद्र मोदी हे आपल्याला खूप ज्युनिअर आहेत आणि त्यांचं काम आपल्याला मदत करणं आहे. आपल्याला वाटेल तेव्हा याला आपण बाजूला करू शकतो.

1995 ला गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 121 जागांवर विजय मिळवत दणदणीत यश संपादित केलं. केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले. ही गोष्ट शंकरसिंग वाघेलांना काही रुचली नाही आणि या दोन नेत्यांत सरकार येताच दरी वाढली . मोदींना जवळून ओळखणारे लोक असे सांगतात की या दोघांच्या मतभेद निर्माण करायला नरेंद्र मोदींच्या सुद्धा मोठा वाटा होता. नंतर शंकर सिंग वाघेलांनी तसा आरोप सुद्धा केला होता की मोदी 3 मधील 2 वेळा केशुभाई बरोबर जेवण करतात आणि केशुबापाचे कान भारतात.

यामध्येच खजुराहो कांड झाले, अटल बिहारी वाजपेयींच्या मध्यस्तीने शंकरसिंग वाघेला 3 अटींवर एकत्र यायला तयार झाले
१) केशुभाई पटेल यांनी मुख्यमंत्री पदावरून काढण्यात यावं
२) त्यांच्या समर्थक 6 आमदारांना कॅबिनेट मध्ये घ्यावे
३) नरेंद्र मोदींना गुजरात मधून बाहेर काढावे

या तिसऱ्या अटीवर वघेलांचे कट्टर विरोधक केशुभाई सुद्धा तयार झाले होते, तर दुसरीकडे संघ आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा मोदींना गुजरातच्या बाहेर काढण्याचा निर्णयाला सहमती दर्शवत होते. नरेंद्र मोदींना गुजरात मध्ये ठेऊन त्याचे राजकीय वजन वाढणे हे या दोघांच्या दृष्टीने घातक होते म्हणून मोदींची रवानगी दिल्लीला झाली . वाजपेयींच्या फोनवरून नंतर वाघेलांनी विद्रोह सुद्धा संपवला.

मोदींना अस वाटू नये की आपल्याला शिक्षा दिली त्यामुळे त्यांना केंद्रात मोठी जबादारी देऊन पाठवले. त्यांना भाजपचे महासचिव केलं आणि 4 राज्याची जबाबदारी सुद्धा दिली. हे राज्य होते जम्मू काश्मीर , चंदीगड, हरियाणा ,हिमाचल प्रदेश. म्हणायला तर मोदींचे प्रमोशन झालं होतं पण त्यांना माहीत होतं की या राजकीय लढाईत आपल्या स्व पक्षातील विरोधकांसमोर हारले आहोत. पण ‘हार के बाद ही जीत होती है’ हे लक्षात ठेवून पार्टीचे महासचिव असताना त्यांना आपल्या विजयाची तयारी सुरू केली.1 ऑक्टोबर 2001 काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांचं हॅलीकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं. या हिलीकॉप्टर मध्ये नेताजींबरोबर काही पत्रकार सुद्धा होते त्यातील एक म्हणजे आज तक न्यूज चॅनेलचे कॅमेरामन गोपाल. 1 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी त्यांच्या अंतिम दर्शनाला पोहचले होते तेंव्हाच त्यांना अटलबिहारी वाजपेयींचा फोन आला आणि त्वरित भेटायला बोलावलं. जेव्हा नरेंद्र मोदी अटलंबिहारींना भेटले तेव्हा आपल्या खास हसऱ्या शैलीत वाजपेयी म्हणाले, दिल्लीत पंजाबी जेवण करून तू जाड झालास तुला गुजरातला जायला हवं हा वाजपेयींचा संदेश होता मोदींना परत गुजरातला पाठवण्याचा. केशुभाई पटेलांविरोधात पक्षात नाराजी वाढत होती. भुजमध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा केशुभाई पुनर्विकासच काम व्यवस्थित करू शकत नव्हते. तसच पोटनिवडणुकीत सुद्धा पक्षाला हार पहावी लागली होती. हे सगळं समोर ठेऊन मोदींना मुख्यमंत्री बनवून गुजरातमध्ये पाठवण्याचा निर्णय पक्षाच्या हायकामंडचा झाला होता.

मोदींचे चरित्रकार ए. व्ही कामत लिहितात की मोदी मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक नव्हते. ते त्यावेळी वाजपेयींना म्हणाले होते की, मी सत्ता नाही संघटनच सांभाळतो , पण ही नाण्याची एक बाजू होती त्यांचे चरित्रकार जरी मोदींच्या त्यागाची बाजू मांडत असले तरी विश्वसनीय सूत्र असं सांगतात की दिल्लीत बसून मोदी आपल्या ‘घरवापसी’चीच तयारी करत होते. नरेंद्र मोदी गांधींनगर वरून दिल्लीला तर आले पण त्यांच मन गुजरातच्या मातीतच रमलेलं होत. खजुराहो कांडच्या काही दिवसांतच शंकरसिंग वाघेलांनी पुन्हा बंडाचा झेंडा फडकवला आणि मोदींना आयत कोलीत मिळालं. त्यानंतर त्यांनी संघाला सरळ सुनावलं की, माझं म्हणणं बरोबर होत केशुभाई ना पक्ष सांभाळू शकतात ना सत्ता. या दरम्यान टीव्ही चॅनेल भारतात जम धरू लागले होते. त्यामुळे पक्ष मुख्यलयात असताना मोदींना आपला पक्ष मांडायला संधी मिळत असे. याच काळात मोदींनी पत्रकांबरोबर आपले संबंध दृढ बनवले. केशुभाई पटेल यांच्या विरोधात मोदींची लॉबिंग सुरूच होती.

आउटलुकचे माजी संपादक विनोद मेहता एक मॅक्झीनला दिलेल्या मुलाखतीत सांगतात 2001 मध्ये नरेंद्र मोदी मला भेटायला आले, त्यांकडे काही कागदपत्र होते ते केशुभाई पटेलांच्या विरोधात जात होते. त्यांची अशी इच्छा होती की आऊटलुक मॅक्झीनने याचा उपयोग आपल्या रिपोर्टमध्ये करावा, त्यानंतर थोड्याच दिवसांत मला कळालं की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहेत. पण नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री बनवणं एवढं सोपं सुद्धा नव्हतं केशुभाई पटेलांनी शंकरसिंग वाघेलांसाठी एकदा खुर्ची सोडली होती. परत ते अस करायला अजिबात तयार नव्हते. यासाठी केशुभाईंनी आपले 12 आमदार दिल्लीला आपली बाजू मांडायला पाठवले पण पार्टी हायकामंड पुढे त्यांनी सुद्धा आपला पक्ष बदलला , त्यांनतर पक्षातील प्रमुख नेत्यांनी दिल्ली आणि गुजरात मध्ये मोदींच्या नाववर सहमती करण्याची जबाबदारी तीन नेत्यांवर सोपवली.

मोदींना चांगलं माहीत होतं की गुजरात मधील आमदार त्यांच्या नावाला सहमती दर्शविणार नाहीत म्हणूनच ते दिल्लीतून आपली दावेदारी पक्की करत होते. जेव्हा संघाने मोदींच्या नावावर आपली मोहर लावली तेव्हा भाजपला सुद्धा सोपं झालं. अशात पक्षाचे तीन वरिष्ठ नेते. जना कृष्णमूर्ती, कुशाभाऊ ठाकरे आणि मदनलाल खुराणा यांना ही जबाबदारी दिली त्यांनी गुजरातला जाऊन नरेंद्र मोदींच्या बाजूने निर्णय करावा.५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी मदनलाल खुराणां सोबत गांधींनगरला पोहचले, त्याआधीच केशुभाई पटेल यांनी जर मला मुख्यमंत्री पदावरून काढलं तर मी राजकीय जीवनातून सन्यास घेईल अस सुध्दा सांगितलं होत. परंतु मदनलाल खुराणा यांनी केशुभाईंची समजूत काढली, ज्या पक्षाला तुम्ही एवढी दशक दिली तो पक्ष तुम्ही तरी तोडू नाका, निदान तुम्ही तरी शंकरसिंग वाघेला होऊ नका केशुभाई यांनी आपली तलवार म्यान केली आणि 6 तारखेच्या सायंकाळी आमदारांची बैठक झाली आणि त्यात नरेंद्र मोदींना नवा नेता निवडण्यात आलं. केशुभाई पटेल यांनी राजभवनला जाऊन आपला राजीनामा दिला. आणि ७ ऑक्टोबर 2001 ला नरेंद्र मोदींनी गुजरातच्या 14 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

2003 राजस्थानच्या विधानसभा निवडणूका… गुजरातला लागून असलेला जिल्हा असलेला उदयपूर मध्ये सभेसाठी आणि वसुंधरा राजेंचे हात बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदी गेले. आणि जेव्हा ते भाषणासाठी उठले समोर घोषणा सुरू झाल्या… ‘कोण आला रे कोण आलं गुजरात चा वाघ आला’ या निवडणुकीत भाजप विजयी झाले पण राजकीय पंडित विचारात पडले की गुजरातचा वाघ आणि हिंदू हृदयसम्राट यांसारखे विशेषण जे भाजपमध्ये फक्त लालकृष्ण आडवणींसाठी होते ते मोदींना कसे मिळाले. याची सुरवात झाली फेब्रुवारी 2002 मधील गोध्रा कांडानंतर. फेब्रुवारी 2002 साबरमती एक्सप्रेस आयोध्यावरून परत येत होती. तिच्या एक डब्ब्यात कारसेवक बसलेले होते. गोध्रामध्ये त्या डब्ब्याला आग लावण्यात आली आणि 50 हुन जास्त कारसेवक यात मारले गेले. या घटनेने गुजरातमध्ये दंगली उसळल्या सरकारी आकड्यानुसार 1044 लोक या दंगलीत मारले गेले. ही दंगल म्हणजे मोदींच्या राजकीय कारकिर्दीला लागलेला शाप असून विरोधीपक्ष अजून देखील यावरून मोदींना आज देखील टार्गेट करतात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी तर मोदींना यावरून ‘मौत का सौदागर’ ही उपाधीच देऊन टाकली . मोदीं विरोधात अनेक कोर्टात याविषयी खटले चालवले गेले पण या सगळ्यातून सहीसलामत निर्दोष सुटले. पण यातून नरेंद्र मोदी देशासमोर ‘हिंदू आयकॉन’ म्हणून आले. आणि याची प्रचिती पक्षाला 2002 मध्ये झालेल्या कार्यकारणी बैठकीत आली.

४ एप्रिल 2002 गुजरात दंगलीला 1 महिना पूर्ण झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गुजरात दौऱ्यावर होते. यादरम्यान पत्रकार परिषदेत ते म्हणाले परदेशात भारताची मोठी इज्जत आहे ज्यामध्ये मुस्लिम देश सुद्धा आहेत. परंतु जाण्याआधी मी विचार करतोय मी या देशात कोणत्या तोंडाने जाऊ त्यानंतर पत्रकाराने वाजपेयींना प्रश विचारला की मुख्यमंत्र्यांना तुमचा काय संदेश आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, मुख्यमंत्र्यांना माझा एकच संदेश आहे की त्यांनी राजधर्मच पालन करावे , राजधर्म हा शब्द खूप सार्थक शब्द आहे , मी त्याचंच पालन करतोय, राजासाठी प्रजेमध्ये जन्माच्या आधारावर ,जातीच्या आधारावर आणि संप्रदायाच्या आधारावर भेदभाव असू शकत नाही. अनेक घटक पक्ष मिळून वाजपेयी सरकार केंद्रात होत त्यामुळे गुजरात दंगलीवरून वाजपेयींवर मोदींचा राजीनामा घेण्याचा दबाव वाढत चालला होता. काही झालं तरी एका मुख्यमंत्र्यांसाठी ते आपली पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा डाव खेळू इच्छित नव्हते.

11 एप्रिल 2002 दिल्लीहून गोव्याला एक विमान जाते. कारण दुसऱ्या दिवशी गोव्याला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. त्या विमानात 4 लोक होते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी अरुण शौरी आणि जसवंत सिंग. काही दिवसांपूर्वीच वाजपेयी सिंगापूरच्या दौऱ्यावरून आले होते, दौऱ्यावर जाण्याआधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश त्यांनी आडवणींसह काही नेत्यांना दिला होता पण आडवाणी हा मुद्दा लटकवत ठेवायला यशस्वी झाले होते. जस विमान सुरू झालं तस वाजपेयी यांनी समोर पडलेला वर्तमानपत्र हातात घेतल आणि वाचायला लागले, अगदी तशीच कृती आडवणींनी सुद्धा केली. हे काही वेळ पाहताच अरुण शौरी पुढे आले आणि वाजपेयीं समोरील वर्तमानपत्र हटवत विचारलं तुम्ही दोघे असे किती दिवस बोलणार नाहीत हे ऐकून आडवणींनी सुद्धा वर्तमानपत्र हटवल. नंतर वाजपेयींनी आपल्या स्टाईल मध्ये पॉज घेतला आणि बोलले जना कृष्णमूर्ती ऐवजी वैनकय्या नायडू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि मोदीला जावं लागेल. 12 एप्रिल 2002 गोव्यामध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती मंचावर होते वाजपेयी आणि आडवाणी एक एक मुख्यमंत्री येत होते आणि आपली बाजू मांडत होते. नरेंद्र मोदी आले आणि आपल्या सरकारच्या कामाचा पाढा वाचला आणि शेवटी त्यांनी आपला राजीनामा सादर केला. अटलबिहारी वाजपेयींना वाटलं आपलं काम झालं. पण अचानक मंचासमोरील संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते उठले आणि नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देऊन राजीनामा देऊ नका आशा विनवण्या करू लागले. आणि तेव्हाच मोदींचा राजीनामा नाकारला गेला.

एप्रिल २००२ मध्ये गोव्याहून परत आल्र. नरेंद्र मोदींना कळून चुकल होत की पक्ष स्थरावर त्यांना आता कोणी विरोध नाही करणार, जुलै २००२ मध्ये त्यांनी तत्कालीन राज्यपालांकडे विधानसभा भंग करण्याची विनंती केली. त्यांना वाटत होत की दंगलीमध्ये जे मतांच ध्रुवीकरण झालं आहे त्यामध्येच निवडणुका व्हाव्यात जेणेकरून भाजपला त्याचा फायदा होईल. त्यावेळेस मुख्य निवडणूक अधिकारी होते जे.एम.लिंगडोह, लिंगडोह यांनी ऑगष्टमध्ये अहमदाबाद आणि वडोदऱ्याचा दौरा केला. त्यानंतर नुकत्याच दंगली झाल्याने आताच निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती नसल्याच त्याचं मत होत. यावरून लिंगडोह यांनी नरेंद्र मोदींचा राग ओढवून घेतला होता. २० ऑगस्ट २००२ मध्ये वडोदऱ्याहून जवळपास ६०-६५ की.मी. दूर असलेल्या बोडेलीमध्ये एका सभेत नरेंद्र मोदींनी लंगडोह यांच्या जोरदार तोफ डागली. नरेंद्र मोदी म्हणाले, काही पत्रकारांनी मला विचारलं की जेम्स मायकल लिंगडोह इटलीहून आलेत का ? मी त्यांना म्हणालो माझ्याजवळ त्यांची जन्मपत्रिका नाहीये, यासाठी राजीव गांधींनाच विचारणा करावी लागेल. अखेर डिसेंबरमध्ये निवडणुकांची घोषणा झाली. नरेंद्र मोदींनी निवडणुकांसाठी आपली जुनी खेळी वापरली ती म्हणजे ‘रथयात्रा’, ८ सप्टेंबर २००२ ला मोदींनी गुजरातच्या फागवेल येथील भाथीजी मंदिरापासून आपल्या ‘गुजरात गौरव’ रथयात्रेला सुरवात केली. या यात्रे दरम्यान ते १८२ पैकी १५० विधानसभा मतदार संघात पोहचले. राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणे आहे की या यात्रेदरम्यान त्यांनी ‘गुजरात अस्मिता’ या शब्दवर भर दिला पण हा गुजरात अस्मिता शब्द मोदींनी सांप्रदायिकातेसाठी वापरलेला नवा शब्द होता. हे सिद्ध करण्यासाठी अनेक राजकीय विश्लेषक मोदींच हे भाषण उदाहरण म्हणून देतात. नंदियाड मध्ये भाषण देताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस आणि परवेज मुशर्रफ एकच भाषा बोलतात गोध्रामध्ये जे झाल त्यावर ते शब्दही बोलत नाहीत. गोध्रानंतर जे झाल त्यासाठी हे गुजराती लोकांना शिव्या देतात. गुजरात गौरव यात्रेने मोदींना राज्याचा सगळ्यात ताकदवान नेता बनवलं. डिसेंबर मध्ये जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा. तेव्हा यावर शिक्कामोर्तब झाल.

अशारितीने प्रत्येक गत वर्षात नरेंद्र मोदींची ताकद वाढतच होती. २००७ आणि २०१२ मध्ये नरेंद्र मोदींनी निर्विवाद वर्चस्व राखल. २०१२ मध्ये जेव्हा केशुभाई पटेलांनी गुजरात परिवर्तन पार्टी काढली तेव्हा वाटल की मोदींना आता टक्कर मिळेल पण मोदींसमोर केशुभाईंचा सुधा टिकाव लागला नाही. ‘हिंदुत्व’ची कास धरून राजकारण सुरु केलेले मोदी आता गुजरात मॉडेलसमोर करून पुढे येत होते. आणि गुजरात मॉडेल तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. खरा खेळ सुरु झाला तो २०१२ च्या निवडणूक विजयानंतर. २०१२ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी झाले आणि आयुष्यात पहिल्यांदा मिडियाला त्यांनी गुजराती ऐवजी हिंदीत उत्तर दिली. यावेळेस गुजरातच्या जनतेला नाही तर थेट देशाच्या जनतेला संबोधीत करत होते. नरेंद्र मोदींच्या कोअर टीमने गुजरात मधील तिसऱ्या विजयानंतर त्यांना देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला सुरवात केली. संघात सुद्धा याविषयी कुजबुज होती २००९ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना ‘पी.एम इन वेटिंग.’ घोषित करून सुद्धा हार पत्करावी लागली होती. अशात भाजपला नव्या चेहऱ्याची गरज आहे का? याची चाचपणी सुरु झाली होती. आडवाणी आपली दावेदारी सोडायला तयार नव्हते, त्यांना दिल्लीत बसलेल्या वैंकय्या नायडू आणि सुषमा स्वराज या आपल्या खंद्या समर्थकांवर भरोसा होता. पण याआधीच नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कार्यकर्त्यांपर्यंत आपली भूमिका मांडण्यात यशस्वी झाले होते.

गुजरातचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानतर नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपल्या गुजरात मॉडेलला अगदी पटेल अशा पद्धतीने प्रोजेक्ट करत होते. ८ जून २०१३ म्हणजे लोकसभा निवडणुकींच्या जवळपास १ वर्ष आधीचा काळ पुन्हा एकदा गोव्यात भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती. गोवा मोदींना लकीचं होत २००२ मध्ये त्याच मुख्यमंत्रीपद गोव्यातच वाचलं होत आणि आता २०१३ मध्ये ते भाजपमध्ये इतिहास लिहायला चालले होते. राष्ट्रीय अधिवेशनाच्या सकाळी भाजपचे तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल होत की, सायंकाळ पर्यंत धीर धारा तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल पण असं नव्हत की मीडियाची नजर फक्त गोव्यातचं होती .दिल्लीत सुद्धा सगळ्या देशाच लक्ष लागल होत कारण दिल्लीत रुसून बसले होते अजूनही ‘पी.एम इन वेटिंग’ समजणारे लालकृष आडवाणी. त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला येण्यास नकार दिला. सुषमा स्वराज यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी आडवाणींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण आडवाणी अडूनच होते. त्यानंतर राजनाथ सिंग यांनी आडवाणींची तब्बेत खराब असल्याच कारण पुढे करत विषय थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पंतप्रधान पदावर हक्क सांगण्यासाठी आडवाणींनी ‘तुरुपच्या एक्क्याची’ चाल खेळली होती. पण त्यांची हि चाल सुद्धा मोदींच्या घोडदौडीला लगाम लाऊ शकली नाही. संघाने स्पष्ट केल होत की लोकसभेत भाजपचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करणार. आणि अखेर तो दिवस उजाडला. ९ जून २०१३ ला राष्ट्रीय कार्यकारणीच्या समारोपानंतर मोदींना राष्ट्रीय निवडणूक समितीचा संयोजक बनवल्याची घोषणा झाली. हीच नरेंद्र मोदींची अघोषित असणारी दावेदारी घोषित झाली आणि त्यानंतर २०१४ नंतर स्वतःच्या हिमतीवर देशात पहिल्यांदा भाजपचे स्वबळावर सरकार आणण्यात यशस्वी झाले. आता त्यानंतरची कहाणी तर सर्वश्रुत आहे. पण एक मात्र नक्की कधीकाळी संघाच्या केशवभवन मध्ये झाडू मारणारा संघाचाच एक कार्यकर्ता आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान आहे.

source : maharashtra desha web news portal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *