जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील वाळू चोरी बंद झालेली नाही
एरंडोल प्रतिनिधी ::> गिरणा नदीपात्रातील पाणीसाठा कमी होताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. चोरट्या मार्गाने वाळूची दिवसरात्र वाहतूक सुरू असली तरी महसूल प्रशासन मात्र त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे.
तालुक्यातील उत्राण, हणमंतखेडे, टाकरखेडा, वैजनाथ, कढोली यासह गिरणा नदी पात्रालगत असलेल्या परिसरातून वाळूची चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.
तत्पूर्वी, सुमारे पंधरा दिवस गिरणा पात्रात पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे वाळू वाहतूक बंद होती. मात्र, पूर ओसरताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.
सायंकाळी ७ ते पहाटे ६ वाजेपर्यंत शेकडो वाहनातून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक बिनधास्तपणे केली जात आहे. असे असले तरी या भागातील महसूल कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात.
यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. काही ठिकाणी माफियांनी वाळूचे साठे करून ठेवले अाहे. या वाळूची जास्त दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जाते.
राजकीय वरदहस्ताने हे प्रकार सुरू आहेत. त्याविरूद्ध आवाज उठवणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी मिळते. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील वाळू चोरी बंद झालेली नाही.