फैजपूर । प्रतिनिधी, मौजे वडगाव निंभोरा रोड वरील बौद्ध समाजाच्या लोकांसाठी असलेल्या स्मशानभूमीत ग्रामपंचायत वडगाव मार्फत अवैधरित्या सार्वजनीक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. सदर बांधकामासंदर्भात बौद्ध समाजातील लोकांनी अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायतीने व ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
सदर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम बंद करून ते अन्य ठिकाणी करण्यात यावे या संदर्भात दि. २२ जून रोजी बौद्ध समाजातील बांधवांन मार्फत ग्राम विकास अधिकारी वडगाव यांना तक्रार अर्ज देण्यात आलेला होता. परंतु त्या अर्जावर समाज बांधवांना कुठलीही माहिती न देता कुठल्याच प्रकारची कार्यवाही न केल्याने दि. ८ ऑगस्ट रोजी स्मरण पत्र देण्यात आले. तरीसुद्धा त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा खुलासा देण्यात आलेला नाही. तसेच दि. ३० जून रोजी माननीय गटविकास अधिकारी रावेर यांना सदरील तपशिलाचा तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे.
त्यांनीदेखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जागेचा तपशील भूमापन क्रमांक 324 /अ /1 असा असुन ती जमीन हरिजन लोकांच्या स्मशान भूमीसाठी राखीव आहे. तसेच या जागेत अनेक दशकापासून प्रेत ही पुरलेले असून बौद्ध बांधवांच्या भावनेचा प्रश्न आहे. ग्रामसेवकांना व संरपच तसेच ग्रा.पं.सदस्य यांना ही माहिती माहित असल्यावर सुद्धा त्यांनी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम चालू ठेवल्याने बौद्ध समाजबांधवांच्या भावनेशी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने खेड केला असुन बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. वरिष्ठांनी ठोस पावले उचलत त्यांच्यावर कार्यवाही करुन निलम्बनाची कार्यवाही करावी अशी मागणी बौद्ध समाजबांधवांनी केले आहे.
ग्रामसेवकांना आणि सरपंचांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी यासंदर्भात कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही. तर उलट उडवाउडवीची उत्तरे देत बांधकाम चालू ठेवले आणि बौध्द लोकांच्या भावनेशी खेळले.
आनंदा वाघोदे, वडगाव
ही जमीन फार पूर्वीपासून बौद्ध समाजाच्या अंत्यविधीसाठी देण्यात आलेले आहे. यावर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ग्रामपंचायतला कोणताही अधिकार नाही. त्या जमिनी सोबत बौद्ध लोकांच्या भावनेचा प्रश्न जुळलेला आहे. तर त्याठिकाणी शौचालय बांधण्यात येणार आहे. त्या ठिकाणी काही लोक पुरवली गेली आहे. त्यामुळे तेथे शौचालय बांधणे चुकीचे आहे.
सचिन वाघोदे, वडगाव
सार्वजनिक शौचालय बांधकाम हे बौध्द लोकांच्या दफनविधी च्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करायला पाहीजे होते. कारण, आपले पूर्वज या ठिकाणी पुरविण्यात आले असुन आपण त्याची विटंबना करत आहो तर शौचालय इतर ठिकाणी होऊ शकते. परंतु, अत्यंविधीसाठी ती जागा आहे. तसेच तिथे लाईटची व्यवस्था नाही, बसण्यासाठी व्यवस्था नाही ते सोडून शौचालयच का?
सुरेश वाघोदे, वडगाव
बौध्द समाजाच्या स्मशान भूमीच्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधणे म्हणजे हा प्रकार अतिक्रमण झाला असून असंख्य लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. तरी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
किशोर लहासे, वडगाव