फैजपूर-यावल रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

अपघात क्राईम फैजपूर यावल

फैजपूर प्रतिनिधी >> रस्ता ओलांडणाऱ्या तडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. फैजपूर ते यावल रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ ही घटना घडली. गुरुवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन प्रेमी अनिल नारखेडे यांना दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. तर अजय पाटील, हंबर्डी यांनी यावल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना कळवले.

घटनास्थळी अनिल नारखेडे व वन विभागाचे अधिकारी तत्काळ उपस्थित झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणी केली. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन इंगळे यांनी तपासणी करून तडसाला मृत घोषित करून त्याचे शवविच्छेदन केले. यावेळी अजय पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, मयूर नारखेडे, वनपाल आर.सी. सोनवणे, वनपाल पी.आर. पाटील, वन रक्षक सुपडू सपकाळे, वन मजूर शिवाजी पाटील, वाहन चालक सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.