खडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी

Politicalकट्टा कट्टा

काल मला कोणीतरी म्हणाले कि एकनाथ खडसे ब्राम्हण द्वेष्टे आहेत. नाही, खडसे हे ब्राम्हण द्वेष्टे नाहीत फार तर ते डॉ. राजेंद्र फडके द्वेष्टे आहेत आणि हो अगदी उघड सांगायचे झाल्यास एकनाथ खडसे हे अतिशय देवेंद्र फडणवीस द्वेष्टे आहेत, खडसेंना फडणवीस जळी स्थळी दिसतात व्हिलन वाटतात अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, मदन पुरी, गुलशन ग्रोव्हर सारखे भासतात. जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कित्येक वर्षे दिवंगत डॉ. अशोक फडके यांनी त्यावेळचा जनसंघाचा किल्ला एकट्याच्या खांदयावर अनेकदा लढविला त्या डॉ. फडके यांच्या भाजपमय चिरंजीवाला मात्र एकनाथ खडसे यांनी कधीही फारसे मानाचे स्थान मिळवू आणि मिळवून दिले नाही, म्हणाल तर आजही राजेंद्र फडके किंवा त्यांची तिसरी पिढी सौरभ फडके सर्वसामान्य नेत्यासारखे या पक्षात जगताहेत त्यांनी आपल्या भाजपानिष्ठा जपल्या आहेत. निखिल हा एकुलता एक मुलगा अकाली गेल्यानंतर वास्तविक खचलेल्या एकनाथ खडसे यांनी जिल्ह्याच्या राजकरणात, राज्य पातळीवर भाजपमध्ये अंतर्गत सर्वांशी जुळवून घ्यायला हवे होते, मिळून मिसळून राहायला हवे होते तसे त्यांनी केले असते तर अधिक बरे झाले असते, खडसे त्यातून आजही भाजपा नेतृत्व म्हणून चर्चेत राहिले असते. पण आतून खचलेले एकनाथ खडसे उगाचच उसने अवसान आणून आणि त्यांनी अनेक गंभीर चुकांचे पुरावे काहींच्या हातात असतांनाही दुर्दैवाने खडसे वरचढ वागत गेले चुकत गेले त्यातूनच ते आता संपत आले आहेत…

मी नेहमीच सांगतो कि वर्गातला हुशार पण शांत गंभीर सुस्वभावी विद्यार्थी वर्ग शिक्षकांचा आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांचा आवडता असतो आणि छान छान दिसणाऱ्या वर्गातल्या मुलींचा तर तो हिरो असतो त्याला वर्गात डिमांड असते कारण त्याची स्वतःच्या स्वभावावर कमांड असते. पण जर वर्गातला हुशार विद्यार्थी आगाउ असेल त्याला वाईट संगती असतील वाईट सवयी असतील, तो बोलायला उद्धट आणि वागायला उर्मट असेल तर सुरुवातीची काही वर्षे भलेही त्याचे ऐकून घेतले जाते पण त्याची लोकप्रियता पुढे रसातळाला जाऊन वर्गातले सारे त्याचा द्वेष करायला लागतात, मग ते त्याला मुद्दाम टाळतातही. जळगाव नावाच्या राजकीय वर्गात असेच चार अत्यंत हुशार विद्यार्थी होते, दिवंगत बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी, सुरेशदादा जैन, प्रतिभाताई पाटील आणि एकनाथ खडसे या चौघांच्या सोबतीला आणखी दोन विद्यार्थी होते ते सामान्य दर्जाचे होते पण या चौघांच्या धावपळीत त्या दोघांनी त्यांच्या राजकीय वर्गात मजा मारून घेतली, त्यातले एक होते जीवराम तुकाराम महाजन जे आता हयात नाहीत आणि दुसरेही महाजानच आहेत त्यांचे नाव गिरीश महाजन .

मोठ्यांच्या भांडणात छोट्यांचा मस्त फायदा होतो, सुरेशदादा जैन बाळासाहेब चौधरी आणि प्रतिभा पाटील या तिघांच्या जीवघेण्या राजकीय स्पर्धेचा एकेकाळी नेमका फायदा घेतला तो जी तू महाजन यांनी ते शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात परिवहन गृह इत्यादी महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. हे असेच गिरीश महाजन यांच्याही बाबतीत घडले, एकनाथ खडसे विरुद्ध पक्षश्रेष्ठी व एकनाथ खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन या नेमक्या जीवघेण्या राजकीय युद्धाचा द्वेषाचा भांडणाचा फायदा उचलला तो गिरीश महाजन यांनी , एरवी नेते म्हणून एकेकाळी अगदीच सर्वसामान्य भासणारे गिरीश महाजन जैन आणि खडसे यांना हूल आणि भूल देऊन मंत्री झाले यशस्वी ठरले….पहिल्या बेंचवर अनेक वर्षे बसणारे खडसे आणि जैन हे मागच्या बेंचवर केव्हा फेकल्या गेले त्यांना स्वतःला देखील ते चटकन ध्यानात आले नाही, ध्यानात आले तेव्हा वेळ निघून गेली होती, उशीर झाला होता आणि सर्वात मागच्या बेंचवर कायम हसत बसणारा काहीसा खोडकर सदा हसतमुख विद्यार्थी गिरीश महाजन पहिल्या बेंचवर केव्हा येऊन बसला भल्या भल्या जळगावकरांच्या ते लक्षात आले नाही. अर्थात जळगाव जिल्ह्याची सध्याची राजकीय घडी आणि परिस्थिती केवळ या लेखात संपविणे मला शक्य नाही पण एक मात्र नक्की आहे कि एकनाथ खडसे अजिबात शंभर टक्के भाजपा सोडून अन्यत्र जाणार नाहीत ते आपले स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेणार नाहीत…
क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *