फडणवीसांसोबत खडसेंची भेट भाजप की राष्‍ट्रवादीचे नेते म्‍हणून होणार ?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव :: भाजपा पक्षावर नाराज असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. एकीकडे, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सुरू असताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत होणारी भेट भाजप की राष्‍ट्रवादीचे नेते म्‍हणून होणार? याविषयी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे.

माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या जी. एम. रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी फडणवीस हे मंगळवारी जामनेर शहरात येणार आहेत. तत्‍पुर्वी म्‍हणजे येत्‍या दोन दिवसात एकनाथ खडसे यांच्या राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्‍याचे सांगितले जात आहे. यामुळे खडसे हे भाजपात असतील की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जामनेरात मल्टिपर्पज रूग्णालय उद्घाटन ::> जामनेर येथील आ.गिरीश महाजन यांनी जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून मल्टिपर्पज हॉस्पीटल उभारले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय आहे. त्याचे उद्‌घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी राज्यातील काही माजी मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ खडसेंची उघड भूमिका ::>
भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर अनेकवेळा उघडपणे टीका सुद्धा केली आहे. पक्षाच्या नाराजीमुळे ते भाजपाला सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा साधत आरोप केले होते. यानंतर फडणवीस हे प्रथमच जळगाव जिल्‍ह्‍यात येत असल्‍याने याबाबत चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

म्‍हणूनच खडसेंच्या प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह::> एकनाथ खडसे सध्या मुंबईत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करण्यासाठी ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची भेट काही होऊ शकलेली नाही. परंतु ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार, हे निश्‍चित मानले जात आहे. येत्या सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुरूवारी झालेल्‍या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीस खडसे उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात येत असल्याने तो पर्यंत एकनाथ खडसे भाजपात राहून व्यासपीठावर फडणवीसांच्या सोबत बसणार की राष्ट्रवादीत जाणार? या कडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे.

संदर्भ :: eskal.com/ सरकारनामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *