फुटण्याची भीतीनेच भाजपकडून आमदारांना सत्ता येण्याचे चॉकलेट : एकनाथ खडसे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. यातील एकही पक्ष बाहेर पडू शकत नाही. हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार याची खात्री असल्याने मी दूरदर्शीपणा ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सरकारबाबत आपण निश्चिंत असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्पष्ट केले.

दरम्यान, आपले आमदार पळून जाण्याच्या भीतीने भाजपने त्यांना सत्ता येणार म्हणून चॉकलेट देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला असल्याची टीकाही त्यांनी केली.

रडणाऱ्या बाळाला चॉकलेट, आईस्क्रिम सारखे आमिष दाखवावे लागतात. राजकारणात मीदेखील हे उद्योग केले आहेत.

२०१४ मध्ये शरद पवारांच्या मदतीने राज्यात भाजपची सत्ता आली होती. त्यावेळी ५० पदांसाठी आम्ही जवळपास २०० जणांना आश्वासने दिली होती.

तशी आश्वासने आता भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी द्यावी लागत आहेत. हे सरकार ५ वर्षे पडणार नाही हे त्यांनादेखील माहिती आहे.

मला दूरचं राजकारण कळत. तीन पक्षांचे सरकार भाजपला रिक्षा वाटत असेल तर अटलजींनी ३२ पक्षांच्या सरकारची मालट्रक यशस्वीपणे चालवली होती, असेही खडसे म्हणाले.

‘पवार इज पॉवर’… राज्याचे राजकारण, इतिहास आणि महत्त्वाचे निर्णय बघितले तर ‘पवार इज पॉवर’ असे म्हणत खडसेंनी शरद पवारांचा उल्लेख केला.

नेतृत्वाला अहंकार आला तर त्याचे परिणाम संघटनेवर होत असल्याचे त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता सांगितले. नेता-कार्यकर्ता आणि नेतृत्व यांच्यात समन्वय राहिला पाहिजे.