एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित की अनिश्चित ? ठरणार दसऱ्याला ?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश आणखी आठवडाभर लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत निर्णयानंतर मुहूर्त ठरणार आहे. त्यामुळे घटस्थापनाऐवजी खडसे दसऱ्यानंतर हातात घड्याळ बांधण्याची शक्यता त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यांचे निकटवर्तीय उघडपणे पक्ष बदलाचे बाेलत आहेत. परंतु, अद्यापपर्यंत खडसे यांनी स्वत: या विषयी काेणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही.

दरम्यान खडसेंचा घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षप्रवेश हाेईल, असा दावा केला जात हाेता. परंतु, शुक्रवारी दुपारी खडसे हे मुक्ताईनगर येथून जळगाव येथे दाखल दाखल झाले. त्यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यावर दुपारपासून कार्यकर्त्यांची गर्दी वाढत हाेती.

या वेळी दुपारी शहादा, साक्री व धुळे येथील काही राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर दुपारी जळगाव शहरातील भाजपच्या आजी माजी नगरसेवकांसह खडसे समर्थकांनी गर्दी केली हाेती. मात्र, या वेळी खडसेंनी पक्षबदलाचा विषय वगळता अन्य विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मुंबई जाण्याची केवळ चर्चाच : गेल्या चार दिवसांपासून खडसेंचा घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश हाेणार असल्याची चर्चा सुरू हाेती. त्यामुळेच खडसे शुक्रवारी सायंकाळी मुंबईला रवाना हाेणार असल्याचे सांगीतले जात हाेते. परंतु, राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत अद्याप तारीख न ठरल्यामुळे खडसे मुंबईला जाणार नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगीतले.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष : विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत. राजकीय पक्षांकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय हाेणार आहे. राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगीतले जात आहे. परंतु, शिवसेनेकडून अद्याप नावे जाहीर झालेली नाहीत. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत नवीन मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

खडसे म्हटले, नो कमेंट्स
शुक्रवारी दुपारी जळगावात असताना राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स असे उत्तर देत या विषयाचे खंडन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. सारे मुहूर्त तुमचेच मध्यामांचेच आहेत. असे ही ते यावेळी म्हणाले. पक्षांताराविषयी काय बोलू? सर्व मुहूर्त तुम्हीच ठरवले. म्हणून काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स या शब्दात हा विषय थांबबला.