धुळे ::> साक्री तालुक्यातील मालपूर येथे नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. आरती पवार असे मृत महिलेचे नाव आहे. साक्री तालुक्यातील दिघावे येथील आरती अशोक पवार ( वय २२) या पतीसह मालपूर गावात आल्या होत्या.
तेथे राहणारे भटू सुखराम पवार यांच्याकडे आरतीला सोडून त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भटू पवार घरी आले. त्यावेळी छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आरती पवार आढळून आल्या.
दोर कापून त्यांना खाली उतरवण्यात येऊन खासगी वाहनाने साक्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. गोहील यांनी तपासणी करून आरती पवार यांना मृत घोषित केले. मृत आरती व अशोक यांचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी भटू पवार यांच्या माहितीवरून साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.