मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू; मोठ्यावर खुनाचा गुन्हा दाखल

अपघात क्राईम धुळे माझं खान्देश साक्री

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील गुंजाळपाडा येथे मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ विश्वास अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोठा भाऊ वेडू अहिरे याच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळनेरपासून जवळ असलेल्या गुंजाळपाडा येथील विश्वास झिपरू अहिरे (वय ५२) हे नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी आले. या वेळी ते शिवीगाळ करत होते. त्यांच्या शेजारीच मोठा भाऊ वेडू झिपरू अहिरे हे राहतात. लहान भाऊ विश्वास हा आपल्याला शिवीगाळ करतो आहे, असा भ्रम वेडू अहिरे यांचा झाला. यातूनच त्यांनी विश्वास अहिरे यांना मारहाण केली. त्यानंतर विश्वास अहिरे आपल्या घरी जाऊन झोपून गेले. बुधवारी (२ रोजी) सायंकाळी हा प्रकार घडला.

यानंतर गुरुवारी सकाळी विश्वास अहिरे हे झोपेतून उठलेच नाहीत. त्यांना आवाज देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, शुक्रवारी पोलिसांना शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला. अंतर्गत दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे.

वेडू अहिरे यांनी केलेल्या मारहाणीमुळेच अंतर्गत दुखापत झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी मृत विश्वास अहिरे यांच्या पत्नी शेगीबाई अहिरे (वय ४८) यांच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.