जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांची माहिती
धुळे प्रतिनिधी ::>काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या वेळी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिली.
तहसील कार्यालय किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्याची सूचना व्हीसीत देण्यात आली. केंद्र शासनाचे कृषी धोरण त्वरित रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे. तसेच १० ऑक्टोबरला व्हर्च्युअल सभा होणार आहे.
या सभेचे प्रसारण प्रत्येक गावात करण्यात येणार आहे. व्हीसीत मंत्री नितीन राऊत, अॅड. के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या सचिव वामशी चांदणी, आशिष दुवा आदी सहभागी झाले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दिली आहे.