धुळे >> शहरातील कालिका माता मंदिराजवळ जितेंद्र शिवाजी मोरे (३५, रा़ फुले नगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उजेडात आली़ घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले आणि त्यांचे पथक व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कालिका माता मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळच त्याचा मृतदेह दगडाच्या थारोळ्यात निपचत पडलेला होता. तर एमएच १९ एडी १४५३ क्रमांकाची दुचाकी नदीपात्रात पोलिसांना तपासाअंती सापडली आहे. ती त्याचीच आहे की दुस-याची त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. अनेकांच्या प्राथमिक चौकशीतून ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. जितेंद्र मोरे हा गरुड कॉप्लेक्समधील एका कुरियर सेंटरमध्ये कामाला होता. सायंकाळी उशिरा आलेले पार्सल उतरवून तो घराकडे निघाला होता़ त्याचे मागच्याच वर्षी लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील असल्याचे सांगण्यात आले. धुळे शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा तपास सुरु आहे.