कत्तलखान्यातून २० गायींची सुटका, पोलिस पथकाची पाळधीत कारवाई

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव ::> गेल्या काही दिवसांपासून पशुधन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासात चोरी केलेल्या काही गायी पाळधी (ता.धरणगाव) येथील कत्तलखान्यात असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यात कत्तलखान्यातून २० गायींना जीवदान देण्यात आले. यापैकी १० गायी चोरीच्या होत्या. हे सर्व पशुधन कुसुंबा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.

भुसावळ शहर व जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात गायी चोरी झाल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास करताना चोरीस गेलेल्या गायी पाळधी (ता.धरणगाव) येथील दोनगाव रोडवरील कत्तलखान्यात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.

अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर, धरणगाव व भुसावळ येथील पोलिस पथकाने कत्तलखान्यात छापा टाकला. त्यात रामानंद नगर येथील ६ भुसावळ येथील ४ अशा चोरीच्या १० आणि इतर १० गायी सापडल्या. ही जनावरे कुसुंबा येथील गो शाळेत रवाना करण्यात आली.

कारवाईवेळी उपअधीक्षक निलाभ रोहन, एलसीबीचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, अंबादास मोरे, धरणगावचे पवन देसले यांच्यासह धरणगाव, भुसावळ, रामानंद नगर, स्थानिक गुन्हे शाखा व पाळधीचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच जनावरांचे अवशेष, हाडे जेसीबीद्वारे खड्डा खोदून पुरण्याचे काम सुरू होते.

असा लागला सुगावा
रामानंदनगर पोलिस ठाण्यात पशुधन चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. भुसावळ शहरात काही गुन्हे दाखल होते. याअनुषंगाने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीतून जनावरे चोरीप्रकरणाशी पाळधी येथील कत्तलखान्याचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

दंगा नियंत्रण पथक
पोलिसांनी कारवाई केलेल्या घटनास्थळी गायींची शिंगे आणि मांस मिळून आल्याची चर्चा होती. मात्र, कारवाई सुरू असल्याने पोलिसांनी माहिती देणे टाळले. दरम्यान, कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रक पथकासह एसआरपी पथक देखील बंदोबस्तासाठी तैनात केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *