धरणगाव >> शहरात १३ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. मात्र, या बैठकीला आरोप प्रत्यारोपाचे राजकीय गालबोट लागले. बैठक आटोपताच भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, शहराध्यक्ष दिलीप माळी अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
पाणीप्रश्नावर शहरात नाराजी वाढल्याने सत्ताधाऱ्यांनी मुख्याधिकारी पवार यांना सर्वपक्षीय बैठकीची सूचना केली. पण त्यासाठी एकाच पक्षाचे जास्त पदाधिकारी बोलावले होते. पालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेल्यांना मुद्दाम बोलावले नाही. त्यामुळे लवकरच तारीख निश्चित होईल, असे संजय महाजन, दिलीप महाजन यांनी कळवले.